Advertisement

धर्माच्या राजकारणालाही हवा चाप

प्रजापत्र | Wednesday, 11/01/2023
बातमी शेअर करा

धर्मांतराच्या मुद्यावरून दाखल याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतराच्या मुद्याला राजकारणाचे रूप येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. सक्तीने होणारे धर्मांतर गंभीर असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. धर्मांतरासारख्या विषयाचे राजकारण नको अशी अपेक्षा वावगी नसली तरी ज्यांना प्रत्येक गोष्टीत धर्म दिसतो आणि धर्माच्या आधारे ज्यांच्या भूमिका बदलतात अशांच्या हाती सत्तेची सूत्रे असतील आणि ज्यांची सत्ताच धर्माचे राजकारण करून आलेली असेल अशा काळात धर्माचे राजकारणही थांबले पाहिजे यासाठी भूमिका घेण्याची गरज आहे.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयासमोर सध्या कोणते विषय चर्चेला येतील हे सांगता येत नाही. एकीकडे सामान्यांच्या रोजच्या जगण्या मरण्याच्या विषयांवरील कितीतरी प्रकरणे तालुकापातळीवरच्या न्यायालयापासून अगदी देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्षानुवर्ष प्रलंबित पडलेली असतात मात्र त्यावर निर्णय होत नाही. आणि दुसरीकडे निव्वळ प्रोपोगंडा स्वरूपाची प्रकरणे मात्र न्यायालयात ढिगारे दाखल होतात आणि त्याच्या सुनावणीलाही वेळ मिळतो. न्यायालयात कोणी कोणते प्रकरण दाखल करावे याला काही बंधन नाही आणि प्रकरण आल्यानंतर न्यायालयाला त्याची सुनावणीदेखील घ्यावीच लागते त्यामुळे धर्मांतरासारखा खरे तर एखाद्याच्या व्यक्तीगत जीवनाशी संबंधित विषय देखील देशाच्या दृष्टीने आता कळीचा मुद्दा बनत चालला आहे. वाढते धर्मांतर रोखण्यासाठी कडक कायदे करावेत अशी मागणी करणारी याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. तामिळनाडू सरकारच्या या याचिकेला उत्तर देताना सदरची याचिका ‘राजकारणाने प्रेरित’ असल्याची भूमिका घेतली गेली. ही भूमिका घेताना तमिळनाडूमध्ये सक्तीने किंवा अमिषाने धर्मांतर होत नाही असे तेथील सरकारने स्पष्ट केले. यावर सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर ही गंभीर समस्या आहे. मात्र याला राजकारणाचे स्वरूप येऊ देऊ नका अशी अपेक्षा व्यक्त केली गेली.
वरकरणी सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी तमिळनाडू सरकारच्या भूमिकेवर असल्याचे भासत असले तरी आज देशाची परिस्थिती काय झाली आहे हे सांगायला ही टिप्पणी पुरेशी आहे. खरे तर धर्माबद्दल बोलताना किंवा धर्माची व्याख्या करताना ‘यो धारयते सो धर्मा:’ अर्थात जो धारण करता येतो तो धर्म अशी सरळ साधी व्याख्या करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येकाला आपले जगण्याचे सूत्र किंवा जगण्याचा मार्ग काय असावा हे ठरविण्याचा दिलेला अधिकार आणि त्याने निवडलेला मार्ग हा त्याचा धर्म इतकी सरळ सोपी ही संकल्पना होती. मात्र मध्यंतरीच्या काळात धर्माचा वापर राजकारणासाठी करण्याची स्पर्धा लागल्यानंतर आता कोणत्याही गोष्टीकडे धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची एक विध्वंसक मानसिकता फोफावली आहे. त्यातही हिंदू धर्माच्या रक्षणाचा ठेका केवळ आपणच घेतला आहे असे समजणारा भाजप आणि इस्लामचे एकमेव तारणहार आपण आहोत या मानसिकतेतून वागणार्‍या ओवेसी बंधूंचा एमआयएम, या आणि असल्याच धर्माच्या आधारित राजकीय प्रवाहांना ज्यावेळी प्रतिष्ठा मिळते  त्यावेळी धर्माच्या नावावर विव्देष पसरविण्याचे काम सुरू असते. सध्या देशभरात तेच सुरू आहे.
कोणत्याही व्यक्ती अथवा समूहाचे सक्तीने धर्मांतर होत असेल तर ते चुकीचेच आहे पण त्याचवेळी प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार धार्मिक श्रध्दा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे हे कसे नाकारणार. एखादा व्यक्ती अथवा समूह त्याच्यावर परंपरेने बिंबविलेला धर्म सोडायला तयार होत असेल तर त्या मागची कारणे देखील स्वत:ला धर्मरक्षक म्हणविणार्‍या धर्ममातर्ंंडांनी शोधायला हवीत. मात्र आपल्याकडे धर्मचिकित्सा नावाचा प्रकार  असल्या धर्ममातर्ंंडांनी कायम त्याज्य ठरविलेला आहे आणि चार्वाकांपासून ते अगदी ज्ञानोबा, तुकोबापर्यंत धर्मचिकित्सा करू पाहणारांना या व्यवस्थेने संपविले आहे. धर्मचिकित्सा करायची नाही आणि उलट रोजच्या जगण्यातील आहार विहारात धर्म शोधायचा, केवळ प्रतिके आणि प्रतिमांमध्ये धर्म शोधायचा अगदी सिनेमातल्या नट किंवा नटीचा धर्म कोणता यावरून कोणत्या दृश्यावर आक्षेप घ्यायचे अशी जर सामाजिक मानसिकता वाढीस लावली जाणार असेल तर मग कोठेही धर्म घुसणारच. मग अशावेळी धर्मांतराचा मुद्दा तरी बाजूला कसा राहील. धमार्ंंतरासारख्या विषयावर राजकारण नको ही अपेक्षा गैर नाहीच पण मुळात या विषयाच्या पलिकडे जाऊन धर्माचे राजकारण नको अशी सांगण्याची वेळ आज आलेली आहे. फक्त हे सांगण्याचे धारिष्ठ कोणती यंत्रणा दाखविणार हाच काय तो कळीचा मुद्दा आहे.

Advertisement

Advertisement