Advertisement

वाळू माफियांनी प्रशासनाची अब्रू वेशीला टांगली

प्रजापत्र | Saturday, 21/11/2020
बातमी शेअर करा

गेवराईत तहसीलदारांच्या पथकावर हल्ला तर आष्टीत जप्त केलेली बोट पळविली

गेवराई : बीड जिल्ह्यात महसूल आणि पोलीस खात्यातील अधिकार्‍यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पोसलेले वाळू माफिया आता प्रशासनाचीच अब्रू वेशीला टांगू लागले आहेत. गुरुवारी रात्री गेवराई तालुक्यात वाळू माफियांची मजल चक्क तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करण्यापर्यंत गेली तर आष्टी तालुक्यात महसूलच्या पथकाने पकडलेली बोट वाळू माफियांनी पळवून नेली, ती पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पथकाला माफियांच्या मागे पळावे लागले. या दोन्ही घटनांनी पोलीस आणि महसूलच्या अधिकार्‍यांचा वाळू तस्करांवरचा धाक सम्पल्याचेच समोर आले आहे.
                         बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी मोठ्याप्रमाणावर होते. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू तस्कर सर्रास वाळू उपसा आणि वाहतूक करीत असताना महसूल आणि पोलीस विभाग मात्र थातुर मातुर कारवाया करण्यात धन्यता मानत आला आहे. त्यामुळेच वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे.
गुरुवारी गेवराईचे तहसीलदार आपल्या पथकासह तालुक्यातील बोरगाव परिसरात तपासणीसाठी गेले होते. या पथकाने एक हायवा गाडी थांबवली, त्यावेळी त्या गाडीच्या सोबत असलेल्या दुसर्‍या वाहनातील 4 व्यक्तींनी चक्क तहसीलदार सचिन खडे यांच्या पथकावर हल्ला केला. यात तलाठी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या वाहनातील लोकांनी हा हल्ला केला त्या वाहनांची पासिंग नगर जिल्ह्यातील होती असे समजते. या घटनेननंतर सकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गेवराईला भेट दिली. दुसरीकडे आष्टी तालुक्यात तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी वाळू तस्करांविरुद्ध आघाडी उघडली आहे. सीना पात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती त्यांना मिळाल्यावरून त्यांनी वाकी शिवारात छापा मारला ,  तेथे त्यांनी एक बोट जप्त केली, मात्र त्याचा पंचनामा सुरु असतानाच काही लोकांनी चक्क बोट पळवून नेली. महसूल आणि पोलिसांच्या पथकाला सदर बोट पुन्हा ताब्यात घेण्यासाठी 5 तास शोध मोहीम राबवावी लागली.

 

 

Advertisement

Advertisement