Advertisement

औरंगाबाद, बीड, परभणीसह जालन्यात लम्पीमुळे साडेतीन हजार जनावरांचा बळी

प्रजापत्र | Saturday, 07/01/2023
बातमी शेअर करा

बीड - मराठवाड्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून जनावरांना लम्पी आजार झाला आहे. आतापर्यंत औरंगाबाद जालना, परभणी आणि बीडमध्ये 52 हजार 531 जनावरांना लम्पीची लागण झाली असून 3 हजार 672 जनावरे दगावली आहेत. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद केले आहेत. लम्पी अजूनही आटोक्यात आलेला नाही. लम्पीमुळे जनावरे मरण पाऊ लागल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.

 

परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र मराठवाड्यातील औरंगाबाद परभणीसह जालन्यातील लम्पीबाबत समोर आलेल्या आकडेवारीने खळबळ उडाली आहे. कारण या चार जिल्ह्यांतील 1 हजार 499 गावे बाधित झाली असून, 52 हजार 531 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे 3 हजार 672 जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.राजस्थानसह देशातील अनेक राज्यात थैमान घालणार्‍या लम्पीचा प्रादुर्भाव मराठवाड्यात देखील पाहायला मिळाला. त्यामुळे हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम राबवली. मात्र आता लसीकरण केल्यानंतर देखील जनावरांना लम्पीचा लागण होतांना दिसत आहे. तर औरंगाबाद, बीड, परभणी व जालना या जिल्ह्यांमध्ये लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. या चार जिल्ह्यातील 1 हजार 499 गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराने जनावरे बाधित झाली आहेत. तर 52 हजार 531 जनावरे सध्या बाधित आहेत. विशेष म्हणजे यामध्ये गाय, बैल, वासरे यांचा समावेश आहे. चार जिल्ह्यातील 1 हजार 499 गावांमध्ये 17 लाख 76 हजार 737 जनावरांना पशसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र असे असतांना देखील सद्यस्थितीत लम्पी स्कीन या आजाराने या चार जिल्ह्यात 3 हजार 672 जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे लम्पी स्कीन आजाराने चार जिल्ह्यात डोकेवर काढल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेष म्हणजे 1 हजार 366 जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने 3 कोटी 31 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
 

Advertisement

Advertisement