बीड : अंबाजोगाई शहरातील भूखंडाचे आरक्षण दुसर्या भूखंडावर टाकण्याचा प्रकार रद्द करण्याच्या आणि केलेले बांधकाम पाडण्याच्या बीडच्या जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाला राज्याच्या नगरविकास मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. या प्रकरणात आता मंत्र्यांसमोर सुनावणी होणार आहे. सुरेश मोदी यांनी या संदर्भात नगरविकास मंत्र्यांकडे अपील केले होते.
अंबाजोगाई शहराच्या सर्व्हे नं.358 आणि 359 यावरील आरक्षण सर्व्हे नं.78अ मध्ये टाकण्याचा ठराव अंबाजोगाई नगरपालिकेने केला होता. सर्व्हे नं.358 आणि 359 या ठिकाणी खाजगी व्यक्तींची जागा असून त्या ठिकाणी बांधकामही झाले आहे. दरम्यान अंबाजोगाई नगरपालिकेचा तो ठराव रद्द करण्याचे, झालेले बांधकाम पाडण्याचे आणि या प्रकरणात मुख्याधिकारी, नगर रचनाकार यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले होते.
जिल्हाधिकार्यांच्या या आदेशानंतर सुरेश मोदी यांनी नगरविकास मंत्र्यांकडे अपील केले होते. यात बीडच्या जिल्हाधिकार्यांनी अधिकार नसताना निर्णय दिला आहे. ज्या प्रकरणात जिल्हाधिकार्यांना सुनावणी घेता येत नाही त्या ठिकाणी अधिकारांचे सिमोल्लंघन करत जिल्हाधिकारी वागले. तसेच नगरपालिकेचा ठराव चूक आहे की बरोबर याची कुठलीही खातरजमा केली नाही. या प्रकरणात ज्यांची नावे घेतली त्या अनेकांना सुनावणीची संधीही दिली नाही असे अनेक आक्षेप नोंदवत सुरेश मोदी यांनी नगरविकास मंत्र्यांकडे जिल्हाधिकार्यांचा आदेश रद्द करावा आणि बेजबाबदारीने आदेश पारित करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी अशी याचिका दाखल केली. नगरविकास मंत्र्यांनी ही याचिका दाखल करुन घेतली असून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला तातडीने स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणातील सुनावणी नगरविकास मंत्र्यांकडे होणार आहे.
प्रजापत्र | Friday, 20/11/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा