बीड दि. ३ (प्रतिनिधी ) ; बीड जिल्ह्यात खरिपाच्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे वांदे मिटायला तयार नाहीत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप २०२२ चा पीक विमा जमा झाला आहे. मात्र आता त्यातील १२ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना तांत्रीक चुकीने सदर रक्कम मिळाल्याचा दावा बजाज आलियान्झ या विमा कंपनीने केला आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम तात्काळ कंपनीच्या खात्यात वर्ग करावी असे पत्रच विमा कंपनीने अग्रणी बँक अधिकाऱ्यांना दिले आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मागच्या महिन्यात खरिपाचा पीक विमा मिळायला सुरुवात झाली आहे. यासाठी मोठ्याप्रमाणावर संघर्ष देखील झालेला आहे. याच संघर्षातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला आहे. त्यातच बजाज आलियान्झ कंपनीकडून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीक विम्याची नुकसान भरपाई जमा करण्यात आली होती. मात्र आता सदर नुकसान भरपाई तांत्रिक चुकीने जमा करण्यात आल्याचा साक्षात्कार विमा कंपनीला झाला आहे. कंपनीच्या कार्यालयातील चुकीमुळे सदर रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्या आहेत, कंपनीने अद्याप सदर विमा दावे निकाली काढलेले नाहीत , त्यामुळे आता जमा केलेली रक्कम कंपनीच्या खात्यावर परत करावी आणि त्यानंतर विमा कंपनी शेतकऱ्यांच्या विमा दाव्यावर कारवाई करेल असे पत्रच वबजाज आलियान्झ विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अजिंक्य खिर्डीकर यांनी बीडच्या अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिले आहे.या पत्रासोबत तब्बल १२ हजार ८८३ शेतकऱ्यांची यादी जोडण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आणि विमा कंपनी आता परत मागत असलेली रक्कम तब्बल १२ कोटी ३५ लाखाच्या घरात आहे.
प्रजापत्र | Wednesday, 04/01/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा