किल्लेधारुर दि.१ (प्रतिनिधी) -मेंढपाळ असलेल्या वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणांचा शिराढोण (जि.उस्मानाबाद ) येथे दुचाकीचा अपघात होऊन दोघे ठार झाले. मयत दोघे नात्याने मावसभाऊ आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने मोरफळी ( ता. धारुर ) येल्डा ( ता. अंबाजोगाई ) गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कृष्णा कुंडलिक गडदे ( वय-१७ रा.मोरफळी,ता.धारुर),अशोक खोडवे (वय-१९ रा.येल्डा ता. अंबाजोगाई ) असे दोन्ही मयताची नावे आहेत. कृष्णा गडदे याचे वडील मेंढपाळाचा व्यवसाय करतात.त्यांच्या मेंढ्या सध्या शिराढोण (जि.उस्मानाबाद ) परिसरात आहेत. शनिवार-रविवार दोन दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी असल्याने कृष्णा व अशोक हे दोघे मावसभाऊ दुचाकी (क्र.एम.एच. १३ डी.के. ६६५२) वर मेंढ्याकडे गेले होते. शनिवारी (दि.३१) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये कृष्णा गडदे व अशोक खोडवे हे दोघे ठार झाले. यामध्ये एकजण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अधिक माहिती समजु शकली नाही. परंतु नव्या वर्षाच्या स्वागताचा सर्वजण आनंद साजरा करत असताना या दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने दोघांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. या दोन्ही मयतांवर मोरफळी व येल्डा येथे शोकाकुल वातावरणात दुपारी अंत्यविधी करण्यात आला.
बातमी शेअर करा