Advertisement

भाजपात पंकजांना यथोचित सन्मान मिळतोय का?

प्रजापत्र | Friday, 20/11/2020
बातमी शेअर करा

बीड :  माजी मंत्री तथा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे समर्थकांमध्ये मागच्या काही दिवसांपासून अस्वस्थता आहे. पंकजा मुंडे पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना भलेही 'हा पक्ष माझ्या बापाचा आहे ' असे म्हणत असतील , मात्र महाराष्ट्र भाजपचे निर्णय, पंकजा मुंडेंना वगळून म्हणा किंवा विश्वासात न घेता म्हणा होताना दिसत आहेत. भाजप ज्या पद्धतीने पंकजा मुंडेंना वागवत आहे, त्यावरून भाजपलाच पंकजा मुंडे नकोशा झाल्यात का ? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडत आहे.
                          भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांचे २०१४ मध्ये अकाली निधन झाल्यानंतर भाजप त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा यथोचित सन्मान राखेल असे अपेक्षित होते. पंकजा मुंडे यांनीही पितृनिधनाचे दुःख ताजे असतानाही राज्यात संघर्ष यात्रा काढून विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा विजय सोपा केला होता. सुरुवातीला पक्षानेही पंकजा मुंडेंना चांगले स्थान दिले, मंत्रिपद दिले , मात्र देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे स्पर्धक वाटू लागल्या, त्यातच 'मनातल्या मुख्यमंत्री ' हा शब्दप्रयोग सुरु झाला आणि भाजपने -त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी - पंकजा मुंडेंना हळूहळू बाजूला काढत त्यांना पर्याय निर्माण करणे सुरु केले. मग अगदी पंकजा मुंडे विदेशात असताना त्यांचे जलसंधारण खाते काढून घेणे असेल किंवा ओबीसी मंत्रालय राम शिंदे यांना देणे असेल , भाजपने पंकजांना अडचणीत आणण्याचेच प्रयत्न केले. बीड जिल्ह्यात त्यांच्या विरोधात विनायक मेटे यांना बळ देणे हा त्याचाच भाग. अगदी पंकजा मुंडे यांच्या परळीतील पराभवाला देखील पक्षच जबाबदार आहे, असे आजही पंकजा मुंडे समर्थकांना वाटते .
                         विधानसभा निवडणुकीनंतर तरी भाजपचे पंकजा मुंडेंबद्दलचे वागणे बदलेल असे वाटले होते, मात्र भाजपच्या वागण्यात बदल झालेला नाही. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरणीत पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आले ते देखील डझनभर असलेल्या सचिवांपैकी एक. त्यानंतरही त्यांना जबाबदारी काय , तर एका राज्याच्या दोन सहप्रभारींपैकी एक सहप्रभारी ,  विजया रहाटकर , विनोद तावडे हे प्रभारी बनवले जातात , मात्र पंकजांची बोळवण 'सह' पदावर . त्यापूर्वी राज्यसभेवर भागवत कराड यांची  निवड असेल किंवा विधानपरिषदेवर रमेश कराड , पक्षाने पंकजा मुंडेंना पर्याय शोधण्याचाच प्रयत्न केला.
आता अगदी विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी पंकजा मुंडेंच्या विभागात त्यांच्या मर्जीतला उमेदवार दिला जात नाही, आणि जो उमेदवार दिला जातो, तो बॅनरवर गोपीनाथ मुंडे किंवा पंकजा मुंडे यांचे फोटोही घेत नाही, या कोणत्याच गोष्टीचा अर्थ सध्या पंकजा मुंडे समर्थकांना लावता येत नसल्याचे चित्र आहे. भाजपचे एक सूत्र राहिलेले आहे, 'निग्लेकट अँड कुल ' , एखाद्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा आणि शांत राहा , सध्या पंकजा मुंडेंबद्दल भाजप तेच सूत्र वापरत असावा असे चित्र आहे. पंकजा मुंडे अजूनही 'हा माझ्या बापाचा पक्ष आहे ' असे म्हणतात , पण त्याच पक्षात त्यांचा अधिकार केवळ 'भाऊबीज भेटी ' पुरता ठेवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. अर्थात याला पंकजा मुंडे यांचे राजकारण, त्यांचा सामान्यांशी कमी होत असलेला संपर्क , आणि त्यांची कार्यपद्धती जबादार नाही असे कोणी म्हणणार नाही. पण कारणे काहीही असली तरी भाजपलाच पंकजा मुंडे नकोशा झाल्या आहेत का ? अशी सल सध्या मुंडे भक्तांना छळत आहे. 

Advertisement

Advertisement