Advertisement

एप्रिल-मे दरम्यान भारतात येणार कोरोनाची लस,किती असेल किंमत,अदर पूनावला यांनी दिली माहिती

प्रजापत्र | Friday, 20/11/2020
बातमी शेअर करा

मुंबई : करोनावरील लस बाजारात येण्यासाठी आता केवळ तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचा दावा सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला. एप्रिल ते मे महिन्यादरम्यान कोविशिल्ड ही लस भारतात उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी या करोना लसीमुळे आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू याबाबतही त्यांनी माहिती दिली. तसंच या लसीची किंमत किती असेल याबाबतही त्यांनी सांगितलं.
एप्रिल आणि मे महिन्यात कोणीही विचार केला नव्हता की करोनावरील लस ही इतक्या लवकर बाजारात येईल. आतापर्यंत या लसीनं ज्येष्ठ नागरिकांवरही उत्तम परिणाम दाखवले आहेत. ज्या प्रकारे मॉडर्ना आणि फायझरच्या लसी महागड्या आहेत आणि त्यांच्या साठवणुकीचा मुख्य प्रश्न आहे, परंतु या लसीपासून आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू हा मुख्य प्रश्न आहे. आतापर्यंत या लसींचे परिणाम उत्तम आहेत,” असं पूनावाला म्हणाले.  या लसींमुळे आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू याचं उत्तर वेळच देईल. सध्या याबाबत कोणतंही आश्वासन देता येणार नाही. याबाबत आपण केवळ दावा आणि अंदाज बांधू शकत असल्याचंही त्यांनी नमूद केलं
                     ब्रिटनमध्ये ज्याप्रकारे नियामक मंडळाकडून परवानगी मिळते, तसं आम्ही भारतातही मंजुरी घेणार आहोत. सुरूवातीला आपात्कालिन परिस्थितीत या लसीचा वापर केला जाईल. सामान्य जनतेला ही लस मिळण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारासाठी फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर सामान्यांसाठी एप्रिल महिन्यापर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते. दोन आवश्यक डोससाठी या लसीची सर्वाधिक किंमत ही १ हजार रूपये इतकी असेल,” असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं. “सरकार मोठ्या प्रमाणात लसीची खरेदी करेल त्यामुळे ही लस कमी किंमतीत उपलब्ध असेल. आम्ही लवकरच दर महिन्याला १० कोटी डोसचं उत्पादन करणार आहोत,” असंही त्यांनी सांगितलं. आम्ही उत्पादन क्षमता वाढवत आहोत आणि जुलैपर्यंत भारतात ३० ते ४० कोटी डोस देऊ शकणार असल्याचंही पूनावाला म्हणाले.

Advertisement

Advertisement