परळी वै-तालुक्यातील दैठणाघाट येथील स्मशानभूमीच्या परिसरामध्ये स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडाली असून बाळाच्या रडण्यामुळे लोकांचे लक्ष वेधल्याने त्याचे प्राण वाचले. सदर बाळाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मौजे दैठणाघाट या गावातील स्मशानभूमी परिसराजवळ असलेल्या झुडपांमध्ये नुकतेच जन्मलेले अर्भक आढळुन आले. बाळाच्या रडण्याचा आवाज जवळच सुरू असलेल्या एका बांधकामावरील लोकांना ऐकावयास मिळाल्यानंतर मिस्त्री व मजूरांना झुडपांकडे धाव घेऊन पाहीले असता कसलाही कपड़ा अंगावर नसलेले जीवंत स्त्री जातीचे अर्भक रडत असल्याचे त्यांना दिसून आले. सदर लोकांनी याची माहिती आशा वर्कर असलेल्या कल्पना भागवत गुट्टे या महिलेला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून बाळाला झुडपातून बाहेर काढुन त्याला कपड्यामध्ये गुंडाळून धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन परळी उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.उपचारा नंतर बाळाची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.
रात्रीच्या दरम्यान अज्ञात मातेने या स्त्री जातीचे अर्भक फेकून दिले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या बाळाच्या आईचा शोध पोलिस करत आहेत.
बातमी शेअर करा
Leave a comment