बीड दि. १५ (प्रतिनिधी ) भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या अडचणीत सापडल्या आहेत. त्या शिरूर कासार येथे दौर्यावर आल्या असता, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणात शिरूर कासार न्यायालयाने समन्स जारी केले आहे. त्यामुळे त्यांना आता शिरूर कासार न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.
चित्रा वाघ ह्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार यांच्या शिरूर कासार येथील निवासस्थानी आल्या होत्या. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांना संबोधित करताना वाघ यांनी महेबूब शेख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर श्री.शेख यांनी शिरूर कासार पोलीस ठाण्यात वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे श्री.शेख यांनी शिरूर कासार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने शिरूर कासार पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सादर केलेला चौकशी अहवाल न्यायालयाने प्रथमदर्शनी तथ्य दिसून येत असल्याने स्वीकारला. प्रथम वर्ग न्यायाधीश ए.टी. मनगिरे यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात भादंवी 500, 499 अन्वये समन्स जारी केले आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
स्वतःला शहाणे समजणारांविरोधातील लढाई
स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल वक्तव्य करताना यापुढे विचार करावा लागेल. स्वतःला न्यायाधीश समजण्याच्या नादात इतरांची बदनामी करतात आणि आपणच खुप शहाणे आहोत असे समजतात; अशा लोकांच्या विरोधात हे माझ्या न्यायालयीन लढाईचे पहिले पाऊल आहे. ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल.
-महेबूब शेख, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस