Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - वाचाळवीरांचे ‘लाड’ नको

प्रजापत्र | Monday, 05/12/2022
बातमी शेअर करा

सत्तेला भाट कायम हवेहवेसे वाटत असतात, त्यामुळे ज्यांच्याकडे भाटगिरी करण्याची सर्वोच्च क्षमता आहे , अशांना नेहमी सत्तेचा ‘प्रसाद’ देखील मिळत असतो, जनमानसात भलेही असल्याची फारशी शक्ती नसेल, मात्र सत्तेच्या आश्रयाने असले वाचाळवीर बांडगुळासारखे फोफावतात आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाचेच शोषण करतात हेच मागच्या काही काळात पाहायला मिळत आहे. कमीअधिक फरकाने सर्वच पक्षांमध्ये असले वाचाळवीर असले तरी भाजपमध्ये याचे प्रमाण काहीसे अधिकचे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा आणि देशाचाही  सुसंस्कृतपणा जपायचा असेल तर असल्या वाचाळवीरांचे ‘लाड’ थांबविणे आवश्यक आहे.

 

 

महाराष्ट्राची स्वतःची एक राजकीय, सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने मोठ्या उंचीचे राजकारणी दिले आहेत. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते वसंतदादा असतील किंवा उजव्या विचारसरणीचे म्हणून ओळख असलेले वसंतराव भागवत, भाजपचे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अगदी शरद पवार, विलासराव देशमुख, आर.आर.पाटील अशा अनेक सभा गाजविणार्‍या वक्त्यांनी, नेत्यांनी  महाराष्ट्राला एक दिशा देण्याचे काम केले आहे. या सर्वच नेत्यांनी सभेची मैदाने गाजवितानाही सभ्यतेच्या मर्यादा कायम जपल्या.

 

मात्र मागच्या काही काळात महाराष्ट्राच्या या सुसंकृत परंपरेला छेद देण्याचे काम केले जात आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रवक्ते असतील किंवा नेते, बोलताना ताळतंत्र हरवल्यासारखे वागत आहेत. कमीअधिक फेकणे सर्वच राजकीय पक्षात असले नेते आहेत, मात्र भाजपने असल्या नेत्यांची फौजच पाळली आहे. भाजपचा रोज एक नेता उठतो आणि काही तरी बरळतो, कोणत्या तरी महापुरुषावर टीका करतो आणि नवे वाद निर्माण करतो हे रोजचे झाले आहे. अगदी राज्यपालपदावरील व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबद्दल गैरउद्गार काढतात,आणि त्यांचे काही होत नाही हे लक्षात आले की उठसूट कोणताही सोम्या गोम्या उठतो आणि मुक्ताफळे उधळतो हे आता नेहमीचे झाले आहे. असल्या विकृतींची नावे वेगवेगळी असली, कधी गोपीचंद पडळकर, कधी कदम, कधी राणे तर कधी लाड, तरी त्यांची मानसिकता एक आहे. बोलभांडपणाला राजाश्रय मिळतो, भाटगिरी करून पक्षात मोठे होता येते हा विश्वास त्यांना आलेला आहे. भाटगिरीला महत्व येण्याचे, वाचकांचे स्तोम माजण्याची एक नवी राजकीय संस्कृती या महाराष्ट्रात रुजू पाहत आहे. विरोधीपक्षांच्या नेत्यांवर, किंवा विरोधी विचारधारेवर जो अश्लाघ्य आरोप करेल त्याला राजकारणात महत्व देण्याची ही संस्कृती महाराष्ट्रात भाजपनेच वाढविली आहे. मात्र आता ही विषवल्ली सार्‍या संस्कृतीचा, लोकशाहीचा गळा घोटू पाहत आहे आणि हेच सर्वात घातक आहे.

 

भाजपने मागच्या काही काळात असल्या वाचाळवीरांच्या, ट्रोल बहादूरांच्या टोळ्याच पाळल्या आहेत, पोसल्या आहेत. सत्तेच्या आशीर्वादाच्या मस्तीत म्हणूनच हे वळू मग पाहिजे तसे उधळत आहेत. महाराष्ट्रातील बहुजन प्रेरणा असतील, बंधुभावाचे, सौहार्दाचे मोठ्या निगुतीने जपलेले पीक असेल, त्याची वासलात लावण्याचे काम हे वळू करीत आहेत. याचे परिणाम मात्र येणार्‍या अनेक पिढ्यांना भोगावे लागणार आहेत.

 

वाचाळवीरांचे फावते असाच जर एकदा समज झाला तर मग प्रत्येकजण सत्तेत येण्यासाठी, मनाची पदे मिळविण्यासाठी, असल्या बोलघेवड्यांचा कित्ता गिरिविण्याच्या मागे लागेल. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मान्य केले तरी अभिव्यक्तीच्या नावाखाली इतरांच्या निंदा नालस्तीसाठी, राष्ट्रपुरुषांच्या अवमानासाठी तोंडाची गटारे मोकळी केली की राजकारणात मोठे होता येते असे समजणारी पिढी निर्माण झाली तर मात्र महाराष्ट्राचे भवितव्य अंधःकारमय असेल.
 

Advertisement

Advertisement