Advertisement

रुग्णालयाच्या शौचालयातील बादलीत आढळले मृत 'स्त्री' अर्भक

प्रजापत्र | Saturday, 03/12/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई -येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अपघात विभागाच्या शौचालयात अंदाजे दोन दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज शनिवारी (दि.०३) सकाळी उघडकीस आली.
स्वाराती रुग्णालयाचा अपघात विभाग हा नेहमी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकामुळे गर्दीचा असतो. मात्र शुक्रवारी रात्रीतून केंव्हातरी अज्ञात महिलेने ३५ नंबर अपघात विभागाच्या शौचालयातील पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये स्त्री जातीचे अर्भक पाण्यात बुडवून टाकल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी नऊ वाजता अपघात विभागातील सफाई कर्मचारी शौचालयाची सफाई करत असताना बाळ त्याच्या नजरेस पडल्याने ही घटना उघडकीस आली.
याची कल्पना रुग्णालय प्रशासनास मिळताच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. सदरील स्त्री जातीचे अर्भक टाकणारी महिला किंवा आणखी कोणी टाकले ते सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये तपासल्यानंतरच कळणार आहे. सध्या सीसीटीव्ही तपासणी सुरू असुन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement