कोल्हापूर :'गरज सरो अन् वैद्य मरो' या उक्तीचा अनुभव माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना येऊ लागला आहे. ते आता भाजपप्रणीत आघाडीशी काडीमोड घेऊन पश्चिम महाराष्ट्रात स्वतंत्र राजकीय चूल उभी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाची युती तोडल्यानंतर राजू शेट्टींचे राजकारण कमकुवत करण्यासाठी त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांच्याशी जवळीक साधत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले होते. परंतु आता राजू शेट्टी हे राजकीयदृष्ट्या कमजोर झाल्याने सदाभाऊ खोत यांची राजकीय उपयुक्तता संपुष्टात आल्याने भाजपने त्यांना जिल्ह्याच्याही राजकारणातून डावलण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप खोत यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्याची दखल घेतच खोत बंडाच्या प्रयत्नात असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून सांगितले जात आहे.
भाजपने सदाभाऊंचा निधीही परत केला
पश्चिम महाराष्ट्रात भाजपची आजीव सभासद नोंदणी करण्यात येत होती. सदाभाऊ खोत यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांतून आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचे सभासद नोंदणीचे अर्ज आणि पैसे जमवले, पक्षाने दिलेल्या वेळेतच हे सर्व अर्ज पक्षाकडे सुपूर्द केले. परंतु काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींनी सदाभाऊ यांच्या गटांचे सर्व अर्ज फेटाळत त्यांनी गोळा केलेला निधीही त्यांना परत केला. तेथेच सदाभाऊंनी पक्षसंघटनेत आता आपल्याला स्थान नाही हे जाणून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्या वेळी अनेकांनी भाजपला पर्याय निवडावा, अशी विनंती खोत यांच्याकडे केली.