बीड : जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी राखीव जागांवरून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची मोठी अडचण निर्माण होत आहे. तांत्रिक कारणांमुळे अनेकांना जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बार्टीच्या विभागप्रमुखांनी केवळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी म्हणून ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यास परवानगी दिली आहे.
राखीव जागांवरून निवडणूक लढविण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही, त्यांनी पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याची पोच पावती जोडली तरी अर्ज दाखल करता येतो. मात्र जात पडताळणीची प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने सर्व्हरच्या अडचणींमुळे अनेकांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या जात पडताळणीसाठीचे अर्ज केवळ शुक्रवार (दि. २ ) या दिवशी ऑफलाईन दाखल करण्यास बार्टीच्या विभागप्रमुखांनी परवानगी दिली आहे. विभागप्रमुख नंदकुमार बेडसे यांनी हे आदेश दिले आहेत. यामुळे राखीव जागांवरून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.