Advertisement

धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा विहिरीत पडल्याने मृत्यु

प्रजापत्र | Friday, 25/11/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.25 नोव्हेंबर – धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली. याबाबत अद्याप दिंद्रुड पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आलेली नसून मयत मुलीचे प्रेत शवविच्छेदनासाठी धारुर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर (Dharur) तालुक्यातील कासारी येथील साक्षी ज्ञानोबा कदम (वय 15) ही मुलगी स्वतःच्या शेतात विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेली होती. दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास मुलगी विहिरीत पडल्याचे कळले. मुलीचे आईवडील ऊसतोडणीसाठी बाहेरगावी कारखान्यास गेल्याने ती तिच्या चुलत्याकडे राहत असल्याचे समजते. धुणे धुताना पाय घसरून साक्षी ज्ञानोबा कदम विहिरीत पडल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला. सदर घटनेची माहिती समजताच दिंद्रुड पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली.

 

 

मयत मुलीचे प्रेत विहीरी बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व पोलीस दुपारपासून प्रयत्न करत होते. मात्र विहिर पाण्याने भरलेली असल्याने सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तिचे शव विहिरीबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी धारुर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गणेश राठोड करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

 

Advertisement

Advertisement