बीड (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी काकू-नाना हॉस्पीटलमधुन देखील मोबाईल लंपास झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान मोबाईल चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी शहर ठाण्याचे पोनि रवि सानप यांनी टिमला तपासाच्या सुचना दिल्या. त्यानंतर पोनि सानप यांच्यासह टीमने गतीने तपास करत एका मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्या असुन त्याच्याकडून 5 मोबाईल जप्त केले असुन इतरही मोबाईल चोरीचे गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बीड शहरातील काकु नाना हॉस्पीटलमधुन शेख वाशेद शेख शौकत यांचा मोबाईल चोरी झाल्यानंतर पोनि रवि सानप यांच्या सुचनेवरून पोलीसांच्या टीमने काकू नाना हॉस्पीटलमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यामध्ये दिसुन आलेल्या व्यक्तीचा शोध घेवून त्याला बेड्या ठोकल्या. विश्वास शाहुराव पवळ (रा.सिरसपारगाव) याला अटक केली. विश्वास पवळ हा नेहमी नाव बदलत होता. पोलीसांनी सुरूवातीला त्याच्याकडे विचारणा केली असता गोविंदा रामेश्वर घिगे असे त्याने आपले नाव सांगितले. त्यानंतर सिरसपारगाव येथील सरपंचांकडे विचारपूस केली असता त्याचे नांव विश्वास शाहुराव पवळ असल्याचे समोर आले. नंतर त्यानेही विश्वास पवळ हे नाव असल्याची कबुली देत मी नेहमी नाव बदलत होतो असे पोलीसांना सांगितले. यावेळी पोलीसांनी काकु नाना हॉस्पीटलमधुन चोरी गेलेल्या मोबाईलसह इतर 4 मोबाईल असे एकूण पाच मोबाईल जप्त केले आहेत. ही कामगिरी पो.नि. रवि सानप, पीएसआय रमेश गायकवाड, डी.बी.पथकातील कर्मचारी सय्यद अश्फाक, बाळासाहेब सिरसाट, अविनाश सानप,मनोज परझने यांनी केली असुन पुढील तपास पोलीस नाईक मनोज जायभाय करीत आहेत.