किल्ले धारूर दि.24 नोव्हेंबर – धारूर शहरातील उर्दू माध्यमातून शिक्षण देणाऱ्या बीड येथील अंजुमन इशात- ए- तालिम संचलित तालुक्यात एकमेव अनुदानित असलेल्या मिल्लीया प्राथमिक शाळेची नुकतीच मान्यता रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र या निर्णयास पालक व विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर राज्य शासनाने सदर निर्णयास स्थगिती दिली आहे. स्थगितीचे पत्र कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन प्रदिप पडोळे यांनी दि.23 रोजी दिले आहेत.
किल्ले धारूर (Dharur) शहरात जवळजवळ पन्नास वर्षांपासुन मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना उर्दूमधून शिक्षण देत असलेली अंजुमन इशात- ए- तालिम संचलित मिल्लीया प्राथमिक शाळेची (Primary School) बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्याबाबतचे पत्र कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी शिक्षण संचालक (Director of Education) (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले होते. यानंतर या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होवून शासनाच्या निर्णयाचा विरोध दर्शवण्यात आला होता. याबाबत पालकांनी शिक्षण विभागासह शासनाकडे सदर मान्यता रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीचा सकरात्मक विचार करुन सदरील मान्यता रद्दच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. यामुळे पालकांत आनंदाचे वातावरण असून संस्थेने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रयत्न करावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.