Advertisement

ट्विटर-फेसबुकनंतर आता गुगलही करणार कर्मचारी कपात

प्रजापत्र | Tuesday, 22/11/2022
बातमी शेअर करा

 ट्विटर (Twitter) , अॅमेझॉन (Amazon) आणि फेसबुक (Meta) सारख्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांनी अलीकडेच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. या सर्व टेक कंपन्यांप्रमाणेच आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटही 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी जे कर्मचारी कामात कमी पडत आहेत, अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. 

 

 

सहा टक्के कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या 
कंपनीने अद्याप कर्मचारी कपातबद्दल अधिकृतपणे अशी कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. मात्र अनेक माध्यमातून अशा बातम्या समोर येत आहेत. द इन्फॉर्मेशनने (The Information) दिलेल्या वृत्तानुसार, गुगल परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट आणि रँकिंग प्लॅन योजना लागू करून सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. वृत्तानुसार, नवीन प्रणाली अंतर्गत कंपनी 6 टक्के कर्मचारी काढून टाकणार आहे. या योजनेअंतर्गत गुगलचे व्यवस्थापक कर्मचार्‍यांना रँकिंग देऊन त्यांना बोनस आणि इतर अनुदान देण्यापासून रोखू शकतील. सध्या अल्फाबेटमध्ये सुमारे 187,000 कर्मचारी काम करतात. अल्फाबेटने द इन्फॉर्मेशनच्या वृत्तावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीच्या वृत्तावर असे म्हटले आहे की, नोकरी कपात झाल्यास कंपनी नवीन भूमिकांसाठी कर्मचार्यांना अर्ज करण्यासाठी 60 दिवस देईल.

 

 

अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी अल्फाबेटने आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी सुमारे 25 कोटी वेतन भत्ते दिले होते. यातच मंदीच्या बातम्यांदरम्यान, असे म्हटले जात आहे की गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना कंपनीची क्षमता 20 टक्क्यांनी वाढवायची आहे. कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, तिसर्‍या तिमाहीत अल्फाबेटने 13.9 अब्ज डॉलर्स नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 27 टक्क्यांनी कमी आहे.
 

Advertisement

Advertisement