Advertisement

नियमबाह्यपणे खुली केलेली शकडो एकर जमिनीची इनामी मालकी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा केली 'प्रतिबंधित '

प्रजापत्र | Friday, 18/11/2022
बातमी शेअर करा

जगन सरवदे
अंबाजोगाई  : अंबाजोगाई दि. १६ : बीड जिल्ह्यात देवस्थान आणि इनामी जमिनीचे घोटाळे चर्चेत असतानाच बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी अंबाजोगाई शहर आणि परिसरात भूमाफियांनी मोठा धक्का दिला आहे. सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी नसताना, बेकायदेशीररीत्या खालसा करण्यात आलेल्या इनामी जमिनीला  जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा 'प्रतिबंधित मालकी ' ( वर्ग २ ) प्रकारात आणले आहे. त्यामुळे आता या जमिनी पुन्हा इनामी झाल्या असून त्यावर सध्या ज्यांचा ताबा किंवा मालकी हक्क आहे, त्यांची मालकीच वादात अडकली आहे. आता या जागांच्या खरेदी विक्री व्यवहारांवर आपोआप निर्बंध आले आहेत. वेगवेगळ्या इनामी जमिनीच्या प्रकरणात एकाच रात्रीत ही कारवाई झाल्याने  शेकडो  एक्कर च्या आसपासच्या जमिनी पुन्हा इनामी करण्यात आल्या आहेत. या जमिनीवर घरे असणारी संख्या हजारोंच्या घरात असून आता ते देखील अडचणीत आले आहेत.
बीड जिल्ह्यात देवस्थान आणि इनामी जमिनीचे घोटाळे नेहमीच चर्चेत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात देखील इनामी जमिनी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता, किंवा अधिकाऱ्यांना हाताशी धरून , शासनाचा नजराणा न भरताच खालसा करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या इनामी जमिनी खालसा करण्यात आल्यानंतर अनेकांनी त्याची प्लॉटिंग पडून त्या विकल्या आहेत. त्यावर अनेकांची घरे आहेत. अंबाजोगाई शहरातील मोक्याच्या ठिकाणी अशाच इनामी जमिनीवर प्लॉटिंग करून बांधकाम झाले आहे. त्यावर आज हजारो कुटुंबे राहत आहेत. अंबाजोगाई  शहरासह लगतच्या शेपवाडी आणि इतर परिसरातही असे प्रकार घडल्याच्या तक्रारी होत्या.
यासर्व प्रकारच्या संदर्भाने सदर जमिनी पुन्हा इनामी घोषित करण्याची आणि तशी सातबारावर नोंद घेण्याचे आदेश या पूर्वी  अनेकदा देण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. बुधवारी मात्र जिल्हाधिकारी शर्मा यांनी रात्रीतून अशा सर्व जमिनीच्या  बाबतीत सातबारावर 'इनामी ' 'प्रतिबंधित मालकी ' अशी नोंद घेण्याचे आदेश दिले आणि ते करून घेतले आहे. यामुळे शहर आणि परिसरात खळबळ माजली आहे.

---
या सर्व्हे क्रमांकातील जमिनी पुन्हा झाल्या इनामी
अंबाजोगाई 322,320 ,307थोरले देवघर, अंबाजोगाई 307 , 320 ,322 , 169, 180, 181, 183, 218/3 ,224, 292, 335/1, 344/1, 344/2, 345/1, 366, 369, 375, 383/1,383/2, 596 जोगाईवाडी19/1, 19/2, 19/4, 20/1, 21, 22/2, 74/2/1,74/2/2, 75/2/1,75/2/2, 78/3, 79, शेपवाडी65, 67, मगरवाडी15/1 , 40  

---

अनेक दिवसांपासून सुरु होती प्रक्रिया
अंबाजोगातील इनामी जमिनीचे प्रकरण अनेक वर्षांपासून सुरु आहे. विशेषम्हणजे यात फौजदारी प्रक्रिया देखील सुरु आहे. यापूर्वी देखील प्रशासनाने 'सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय खालसा झालेल्या इनामी जमिनी पुन्हा इनामी म्हणून नोंदवाव्यात ' असे आदेश काढले होते. मात्र त्याची अंमलबजावणी बुधवारी रात्री झाली आहे.

---

Advertisement

Advertisement