बीड : बीड दि.13 (प्रतिनिधी) : जगभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेचे चित्र दिसू लागले असून दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढु लागली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे कोरोनाचा मृत्युदर घटू लागला असतानाच दुसरीकडे एका व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्याचे प्रमाण देखील पुन्हा एकदा वाढू लागले असल्याचे चित्र आहे. यामुळे दिवाळी आणि त्यानंतरही प्रत्येकाने अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
कोणत्याही महामारीत किंवा साथ रोगात एका व्यक्तीपासून किती लोकांना बाधा होऊ शकते हा निकष महत्वाचा असतो. याला आर व्हॅल्यू अर्थात रिप्रोडक्शन व्हॅल्यू असे म्हटले जाते. कोणत्याही महामारीत ही आर व्हॅल्यू एक टक्का इतकी असेल तर एका बाधित व्यक्तीकडून केवळ एकाच व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो असे मानले जाते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात देशभरात ही आर व्हॅल्यू पाच टक्क्याच्या पुढे गेली होती. ती आर व्हॅल्यू एक टक्क्याच्या आत आणण्याचे आव्हान होते मात्र सप्टेंबरच्या मध्यानंतर आर व्हॅल्यू खालावू लागली होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ती एक टक्क्याच्या खाली आली. मागील काही दिवसात 0.88 इतके ते प्रमाण होते. त्यामुळे कोरोना संसर्गाचे आकडे झपाट्याने कमी होताना पहायला मिळत होते. आता मात्र हे प्रमाण पुन्हा वाढू लागले असून या आठवड्यात आर व्हॅल्यू 0.88 वरुन 0.95 इतकी झाली आहे. अजूनही आर व्हॅल्यू एक टक्क्याच्या आत असली तरी हा आकडा वाढणे चिंतेचा विषय ठरु शकतो. दरम्यान देशात कोरोनामुळे जाणार्या बळीचे प्रमाण आता अधिक कमी होऊ लागले आहे. एकेकाळी तीन टक्क्याच्या पुढे असलेला कोरोनाचा मृत्यूदर आता 1.47 टक्क्यावर आला आहे.
बातमी शेअर करा