जागतिक पातळीवर सोन्याच्या (Gold) मागणीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र बीड शहरात सोन्याचे भाव स्थिर आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ५१८०० रु प्रति १० ग्राम तर चांदीची किंमत ७४० रु प्रति १० ग्राम एवढे आहेत.
दोन दिवसात सोन्याचे दर वाढले
मागील काळात ऐन दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी मोठी संधी निर्माण झाली होती. त्यावेळी शुद्ध सोन्याचे दर 51 हजार रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर दोनशे-पाचशे रुपये कमी-अधिक होत हे भाव गेल्या महिनाभरापासून याच रेंजमध्ये असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र गेल्या दोन दिवसाच्या काळात 51 हजार 500 रुपयांवरुन हे भाव 52 हजार 800 रुपयांवर जाऊन पोहोचले असल्याचं आज (14 नोव्हेंबर) पाहायला मिळालं आहे.
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढवला
सोन्यामध्ये झालेल्या या दरवाढीच्या मागे आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्याकडे कल वाढवला आहे. यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीत वाढ झाली असल्याचं सोने व्यवसाय करणाऱ्यांनी म्हटलं आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी आगामी काळात ही वाढ अजूनही होण्याची चिन्हे आहे. सोबतच लगीनसराई समोर असल्याने अनेक ग्राहकांनी या वाढत्या दरातही सोने खरेदी करणे पसंत केल्याचं दिसून येत आहे.
दरवाढीमुळे बजेट बिघडलं : ग्राहक
दुसरीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी लग्न कार्यामुळे सोने खरेदी करायची होती आणि त्यात दरात अजून वाढ होण्याची शक्यता असल्याने वाढत्या दरातही आम्ही सोने खरेदी करत आहोत. मात्र यामुळे बजेट बिघडले असल्याने जेवढे घ्यायचे होते त्यापेक्षा कमी दागिने आता घेणार असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे.