परळी वै.दि.१४ (प्रतिनिधी)-दारू पिऊन आलेल्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने दोरीने गळा आवळून पतीचा खून करून नवऱ्याने गळफास घेतल्याचा दिखावा केल्याची घटना परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीवर सिरसाळा पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथील हनुमान उर्फ राजाभाऊ अशोक काकडे (वय-३०) असे मयत पतीचे नाव आहे. सिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी बुऱ्हाण नसीर शेख यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि.११) रात्री हनुमान दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नी वैष्णवी हिच्यासोबत त्याचे जोरदार भांडण झाले. त्यानंतर वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून घेतला आणि रात्री १ ते १.३० च्या दरम्यान दोरीने हनुमानचा गळा आवळला.पतीचा खून केल्यानंतर वैष्णवीने सुताची दोरी छताच्या हुकला अडकवली. त्यानंतर दरवाजा उघडून हनुमानने सुताच्या दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा करत सिरसाळा पोलिसांना तशी खबर दिली. सिरसळा पोलीस कर्मचारी बुऱ्हाण नसीर, शेनकुडे, राऊत, भडंगे यांनी घटनास्थळाची पाहणी करून इतर नातेवाईकांच्या मदतीने हनुमानला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तिथून त्यास परळी येथे हलविण्यात आले. परळीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी हनुमानला तपासून मयत घोषित केले.परळीच्या रुग्णालयात हनुमानच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यातून गळा दाबल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या अभिप्रायानंतर सिरसाळा पोलिसांनी वैष्णवी हिच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून तिला ताब्यात घेतले.