माजलगाव दि.१४ (प्रतिनिधी)-माजलगाव ते मंजरथ या रस्त्याची दैनिय अवस्था झालेली असताना संबंधित विभागाकडून केवळ चालढकल करण्यात येत आहे . यापूर्वी मागील पाच महिन्यात या विरोधात तीन वेळेस आंदोलन करण्यात आले असतांना संबंधित विभागाला जाग न आल्याने गावकऱ्यांनी सोमवारी (दि.१४) गावातील टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
माजलगाव तालुक्यातील मंजरथ या ठिकाणी त्रिवेणी संगम असल्याने दशक्रिया विधीसाठी मराठवाड्यातील लोक या ठिकाणी येत असतात. यामुळे दररोज येजा करणाऱ्यांची माजलगाव - मंजरथ रस्त्यावर मोठी वर्दळ असते. परंतु मागील आठ दहा वर्षापासून हा रस्ता खुपच खराब झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे बस सेवा देखील बंद असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसत असून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.या विरोधात मागील पाच महिन्यात उपोषण व जलसमाधी आंदोलन करून देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही. भीमराव कदम व ज्ञानेश्वर वाघमारे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला शोले स्टाईल आंदोलनाचा इशारा दिलेला असताना देखील त्यांनी याची दखल घेतली नाही. यामुळे सोमवारी (दि.१४) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीमराव कदम व न्यानेश्वर वाघमारे यांच्यासह गावकऱ्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. हे आंदोलन तब्बल दोन तास चालले. संबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्ता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.