बीड दि. १३ (प्रतिनिधी ) : खाजगी कोचिंग क्लासेस आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संघटनेच्या माध्यमातून राज्यपातळीवर काम करणारे बीडचे विजय पवार आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटच्या मैदानात उतरले आहेत. आ. सतीश चव्हाण पुरस्कृत उत्कर्ष पॅनलने त्यांना पदवीधर विभागात खुल्या गटातून उमेदवारी दिली आहे. विजय पवार यांच्या माध्यमातून सिनेटच्या निवडणुकीत एक चळवळ्या आणि अभ्यासू चेहरा उतरला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेट ) निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत तीन पॅनल असतील असे चित्र आहे. विद्यापीठाच्या सिनेटवर मागच्या काही वर्षात सातत्याने आ. सतीश चव्हाण यांचे वर्चस्व राहिलेले आहे. यावेळी आ. सतीश चव्हाण पुरस्कृत 'उत्कर्ष ' पॅनलने आपले उमेदवार जाहीर केले असून यात पदवीधर विभागातील खुल्या गटातून विजय पवार याना उमेदवारी दिली आहे.मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले विजय पवार पदवीधर, शिक्षक, कोचिंग क्लासेस संचालक यांच्यासाठी वारंवार आवाज उठविणार चेहरा म्हणून परिचित आहेत. कोरोना काळात ज्यावेळी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक आणि कोचिंग क्लासेस चालकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी विजय पवार यांनीच आक्रमकपणे यावर भूमिका घेऊन प्रशासनाशी दोन हात करण्याची तयारी देखील ठेवली होती. अशा विजय पवार यांना सिनेटसाठी उमेदवारी देण्यात आल्याने या निवडणुकीतील चुरस आता वाढणार आहे.