बीड : जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेले पाच हिरे राज्यात चमकले आहेत. तीन अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक तर दोघांना उपसंचालक म्हणून बढती मिळाली आहे. या सर्वांनाच पहिल्यांदाच हे पद मिळाले असून काम करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
बीड येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक हुबेकर यांना कोल्हापूर तर गेवराईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महादेव चिंचोळे यांना धुळे येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना मिळाली आहे. त्यानंतर नांदूरघाट ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.महानंदा मुंडे यांना औरंगाबाद उपसंचालक तर बीडचे भूमिपुत्र आणि सातारा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांना पुणे उपसंचालक पद मिळाले आहे. तसेच परळी तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ.मनोहर बनसोडे यांनाही उल्लासनगरला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना मिळाली आहे. या पाच जणांसह सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी पडले. यात बीडमधील पाच हिरे चमकले आहेत. या सर्वांचे स्वागत होत आहे.