Advertisement

दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील गंठण ओरबाडले

प्रजापत्र | Monday, 07/11/2022
बातमी शेअर करा

गेवराई दि.७ (प्रतिनिधी)-पोलीस ठाण्याअंतर्गत रोजच्या रोज घडत असलेल्या चोरीच्या घटना काही केल्या थांबत नसून रविवारी (दि.६) शहरातील गणेश नगर भागातून एका महिलेचा अंगावरील १२ ग्रॅम सोने ओरबाडून नेले तर शहरातील महेश कॉलनी येथून एक स्कुटी व कुंभारवाडी फाटा येथून एक पल्सर गाडी चोरी व आज पहाटे गेवराई बायपास वर एक कंटेनर अडवून चालकाला मारहाण करत २०० लिटर डिजल व पाच हजाराची रोख रक्कम लंपास करत चोरट्यांनी पुन्हा गेवराई पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.

 

          गेवराई पोलिसांच्या हप्तेखाऊ धोरण व वसुली मोहिमेमुळे ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात निर्माण झालेल्या अंतर्गत कलहामुळे कुणीच मन लावून काम करत नसल्याने या घटना घडत असल्याचा प्रकार समोर येत आहे. एकीकडे रोज च्या रोज घटना घडत असताना गेवराई पोलिसांना एकही ठोस कारवाई करता येत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मागील दोन दिवसांपूर्वीच शहरातून कारची चोरी, पाडळसिंगी येथील रोड रोबरीच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा तीनचार वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील आडगाव येथील नातवाच्या शिक्षणासाठी शहरात राहणाऱ्या एका महिलेच्या अंगावरील 12 ग्रॅम सोने भर दुपारी ओरबाडून नेल्याची घटना शहरातील गणेश नगर भागात घडली, यानंतर काल दुपारी शहरातील महेश कॉलनी येथून एक स्कुटी लंपास केली हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून अद्याप याचा शोध लागला नसताना तिकडे ग्रामीण भागातील कुंभारवाडी फाटा येथील कृष्णनगर येथून पांडुरंग शिंदे यांची एम.एच. -23 बी.डी. – 5388 या क्रमांकाची पल्सर गाडी व घरासमोरील एक वशिंग मशीन लंपास केली. तर इकडे गेवराई शहरातून जाणाऱ्या बीड जालना रोडवरील गेवराई बायपास वर चेन्नई वरूण गूजरातला जाणाऱ्या केमिकल लोड कंन्टेनरला हात दाखवून गाडी थांबताच चालक व किन्नर यांना जबर मारहाण करत गाडीत असलेले २०० लिटर डिझेल व पाच हजार रोख रक्कम असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मात्र रोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असताना गेवराई पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार मात्र कुठलीच ठोस कारवाई करताना दिसून येत नाहीत तर वरिष्ठांकडूनही याबाबत काहीच कारवाई होत नसल्याने गेवराई शहरातील नागरिकांकडून पोलिसांवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर रोज रोज घडणाऱ्या घटनेबाबत कुठलीस ठोस कारवाई होत नसल्याने हे चोरटे आता गेवराई पोलिसांना खुले आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

Advertisement