परळी-केशरी कार्ड धारकांची वाढलेली संख्या, तक्रारी, मे व जून महिन्याचे तालुक्याचे धान्य वाटप यासह स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी समजून घेण्याच्या उद्देशाने परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटना, तहसीलदार व पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. दुकानदारांनी उपस्थित केलेल्या समस्यांसह प्राधान्य कुटुंब योजनेतील केशरी कार्ड धारकांच्या स्वस्त धान्य वाटप बाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली, तालुक्यात कुणीही धान्य वाटपापासून वंचित राहू नये अशा सूचना यावेळी मुंडेंनी उपस्थितांना केल्या.
तालुक्यात नियमानुसार धान्य वाटप सुरू असून, शासनाकडून येणारे धान्य व प्रत्यक्ष लाभार्थींची वाढलेली संख्या, तसेच केशरी कार्ड धारकांची अडचण यामुळे धान्य वाटप करण्यामध्ये अडचणी येत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक दुकानाच्या जोडीला एक शासकीय कर्मचारी नेमून द्यावा, जेणेकरुन वाटप नियंत्रण व कमीत कमी तक्रारी येतील असे निर्देश यावेळी मुंडेंनी दिले.
उपस्थितांच्या अडचणी व तक्रारी समजून घेत या बैठकीमधून मुंडेंनी धान्य वाटपाबाबत राज्य सरकारने देऊ केलेले नियतन, ऊसतोड कामगारांच्या आगमनानंतर त्यांना द्यायवायचे धान्य, उपलब्ध साठा या सर्वांचा समग्र आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या.
एप्रिलसह मे व जून महिन्याच्या धान्य वाटपाबाबतही ना. मुंडेंनी केशरी कार्ड धारकांची अडचण सोडवण्याबाबत तहसीलदार विपीन पाटील यांना निर्देश दिले असून, केशरी कार्डधारक, ऊसतोड कामगार, यासह एकही गरजू नागरिक धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये असे निर्देश मुंडेंनी या बैठकीत दिले.
यावेळी तहसीलदार विपीन पाटील यांच्यासह परळी नगरपरिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, कृ.उ.बा.स. संचालक सूर्यभान मुंडे, प.स.उपसभापती बालाजी (पिंटू) मुंडे, जाबेर खान पठाण, किशोर पारधे, सखाराम कराड, चंद्रभान शिंदे, रूस्तूम सलगर, वामन माने, सुभाष बिडकर, नाथराव मुंडे, अंगद फड, सखाराम आदोड, पद्माकर भंडारे यांसह आदी उपस्थित होते.
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment