बीड दि.७ (प्रतिनिधी)-शेतात बांधलेली गाभन म्हैस हिंस्त्र प्राण्याने फाडून खाल्ली ही घटना रात्री घडली. सकाळी शेतकर्यास याची माहिती मिळताच वन विभाग आणि पशुसंवर्धन अधिकार्याला याची माहिती देण्यात आली. ही म्हैस बिबट्यानेच फाडलेली असावी अ्रसा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर परिसरात बिबट्याचे ठसे असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरातील नागरीकांमध्ये या घटनेने दहशत निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली होती. बीड तालुक्यातील खामगाव येथे रात्री एका हिंस्त्र प्राण्याने शेतकरी मोहम्मद हुसेन अब्दुल पठाण यांची म्हैस फाडली. सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर सदरील प्रकार शेतकर्याच्या नजरेस पडला. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शाहेद पटेल यांना दिल्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन अधिकारी ज्योती वाघमारे यांना माहिती देवून घटनास्थळी बोलावले. नंतर वनविभागालाही याची माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी ज्योती वाघमारे या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या प्रकारे म्हैस फाडण्यात आली ही हिंस्त्र प्राण्यानेच फाडली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला तर परिसरात बिबट्याचे ठसे उमटल्याचेही नागरीकांचे म्हणणे आहे. शेतकर्याची गाभन म्हैस हिंस्त्र प्राण्याने फाडल्याने त्याचे तब्बल लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई शेतकर्यास मिळावी आणि या भागात वन विभागाने तात्काळ बिबट्याचा शोध घेवून बिबट्या आहे की नाही हे नागरीकांना सांगावे अशी मागणी होत आहे.
तात्काळ आर्थिक मदत द्या-पटेल
खामगाव येथील मोहम्मद हुसेन अब्दुल या शेतकर्याची बिबट्याने म्हैस मारली आहे. त्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शाहेद पटेल यांनी केली आहे.