बीड -कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूर येथे दरवर्षी यात्रा भरते. यंदाच्या यात्रेचा कालावधी 1 ते 8 नोव्हेंबर असा असून 4 नोव्हेंबर रोजी एकादशी असून 7 नोव्हेंबर रोजी पोर्णिमा आहे. या यात्रेसाठी भाविकांना पंढरपूर येथे जाण्यासाठी सुखकर प्रवास करता यावा यासाठी बीड विभागातून 90 बसेसची सोय करण्यात आली आहे. बीड विभागाच्या 8 आगारातून या बसेस पंढरपूर यात्रेसाठी ये-जा करणार आहेत अशी माहिती रापमचे बीड विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.
कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी बीड व अंबाजोगाई आगारातून प्रत्येकी 15 बसेस सोडल्या जाणार आहेत. तसेच परळी, गेवराई, पाटोदा व आष्टी आगारातून प्रत्येकी 10 बसेस तर धारूर आगारातून 13 बसेस सोडल्या जाणार असून माजलगाव आगारातूनही 7 एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. या बरोबरच बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगड येथेही कार्तिक एकादशीनिमित्त यात्रा भरते. या ठिकाणी भाविकांना जाता यावे म्हणून बीड-नवगण राजुरी, नारायणगड, व गेवराई-साक्षाळपिंपरी-नाराणगड या मार्गावर 13 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. बीड आगारातून 7 तर गेवराई व पाटोदा आगारातून प्रत्येकी 3 बसेस सोडण्यात येणार असल्याचेही विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी सांगितले. या बरोबरच स्वतःच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी 45 प्रवाशांचा समूह असेल तर संबंधितांना एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.