Advertisement

मुंबईने मारले मैदान;पाचव्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

प्रजापत्र | Tuesday, 10/11/2020
बातमी शेअर करा

मुंबई-IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.
दिल्लीने 7 विकेट गमावून 156 रन काढले. कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 64 आणि ऋषभ पंतने 56 रनांची धडाकेबाज खेळी केली. IPL मध्ये अय्यरचे 16 वे आणि पंतचे 12वे अर्धशतक झाले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 69 बॉलवर 96 रनांची पार्टनरशिप केली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 3 , कूल्टर नाईलने दोन आणि जयंत यादवने एक विकेट घेतली.
दिल्लीची अतिशय खराब सुरुवात झाली. संघाने 22 रनांवर 3 विकेट गमवल्या. ओपनर शिखर धवन (15) ला जयंत यादवने क्लीन बोल्ड केले. ट्रेंट बोल्टने दिल्लीला सुरुवातीलाच 2 धक्के दिले. बोल्टने मार्कस स्टोइनिसला सामन्याच्या पहिल्याच बॉलवर आउट केले. यानंतर अजिंक्य रहाणेलाही 2 रनांवर विकेटकीपर क्विंटन डिकॉककडे झेलबाद केले.
१५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने डाव पुढे नेला. रोहितसोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारने आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं. सूर्यकुमारने २० चेंडूत १९ धावा केल्या. रोहितने मात्र सूर्यकुमारच्या विकेटचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. त्याने ५१ चेंडूत दमदार ६८ धावा कुटल्या. तो बाद झाल्यावर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले, तर रोहितसाठी एखाद्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना हे सहावे IPL विजेतेपद ठरले. २००९ला डेक्कन चार्जर्सच्या IPL विजेत्या संघातही रोहितचा समावेश होता.
दरम्यान मुंबईने 5 वेळेस (2013, 2015, 2017, 2019, 2020)आयपील किताब जिंकला आहे.

 

Advertisement

Advertisement