Advertisement

मुंबईहून परतणाऱ्या आठ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना

प्रजापत्र | Monday, 09/11/2020
बातमी शेअर करा

येथील बस आगारातील मुंबईहून आलेल्या ३२ कर्मचाऱ्यांची सोमवारी (दि.९) ॲन्टीजन तपासणी करण्यात आली.यात ८ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. मुंबईहून परत आलेल्या ४४ कर्मचारी व सहवासित मिळून एकुण ५५ जनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
                          महामंडळाकडून सध्या अनेक आगारातील बसेस व कर्मचारी मुंबईत सेवा देत आहेत. धारुर आगारातून सध्या मुंबईच्या सांताक्रुझ व बांद्रा भागात ११ बसेस सोबत ४४ चालक व वाहक पाठविण्यात आले आहेत. आठ दिवस काम करुन सदरील ४४ कर्मचारी परतली असून त्यांची व त्यांच्या संपर्कातील अशा एकुण ५० जणांची कोव्हिड-१९ ची ॲन्टीजन तपासणी येथील कोव्हिड सेंटरवर करण्यात येत आहे. सांयकाळ ६ पर्यंत ३२ कर्मचाऱ्यांची तपासणी झाली असुन यात ८ जण पॉझिटीव्ह आले आहेत. गेल्याच आठवड्यात सोलापूर आगारातील १४४ पैकी ८१ कर्मचारी मुंबईहून परतल्यानंतर पॉझिटीव्ह आले होते. धारुरातही याची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसत आहे. आणखी १२ जणांची तपासणी होणे बाकी असून अनेक जण तपासणीस टाळाटाळ करत आहेत. यापैकी १९ जनांचे स्वॅब नमुने घेण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आगार प्रमुख जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. कर्मचाऱ्यांसाठी आगारातून कसलीही सुविधा उपलब्ध करुन दिल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात यामुळे कर्मचाऱ्यांत दहशत पसरली आहे. शहरात गेल्या पंधरवाड्यात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या आज वाढली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसह सोमवारी ११ जण धारूरमध्ये कोरोना बाधित आढळली आहेत.

Advertisement

Advertisement