बीड : येथील शिक्षक मोहम्मद फहीमोद्दीन अब्दुल रहीम यांना केबीसीच्या नावाखाली २९ लाख रुपयांना चुना लावणाऱ्या सात आरोपींना बीडच्या सायबर सेलने अटक केली होती. आणखी दोघांच्या सायबर पथकाने मुसक्या आवळल्या. यातील अब्दुल कैस हा आरोपी पाकिस्तानातील एकाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे समोर आले. ऑनलाइन फ्रॉडची रक्कम पाकिस्तानकडे तो कशासाठी वळवित होता, याचे गूढ कायम आहे.
शिक्षक मोहम्मद फहीमोद्दीन यांचा मोबाइल क्रमांक पाकिस्तानातील एका व्यक्तीने केबीसीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केला. त्यानंतर केबीसीच्या स्टुडिओचे बनावट व्हिडिओ पाठवून २५ लाखांची लॉटरी, आलिशान कारचे आमिष दाखवून तब्बल २९ लाख २३ हजार रुपये उकळले. १३ डिसेंबर २०२१ रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
या प्रकरणात सुरुवातीला पाच व नंतर दोघांना अटक केली होती. याच साखळीतील अब्दुल कैस ऊर्फ अब्दुल रहेमान शेख हादी (२२,रा.मजोलिया पश्चिम चंपारन, बिहार) व आबिद आलम शामसुल अन्सारी (२८,रा.रानी पकडी मुफस्सील जि.पश्चिम चंपारन, बिहार) या दोघांचा सहभाग आढळला होता. त्यांना आधीच बिहारच्या बेतिया जिल्ह्यातील नवतन पोलिसांनी अवैध दारू प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यावर सायबर सेलचे पो.नि.रवींद्र गायकवाड, हवालदार भारत जायभाये, आसिफ शेख, अन्वर शेख, विजय घोडके, प्रदीप वायभट हे बिहारला रवाना झाले. ६ ऑक्टोबरला तेथील कारागृहातून त्या दोघांना ताब्यात घेऊन पथक १० ऑक्टोबरला बीडला पोहोचले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २० ऑक्टोबरपर्यंत पाेलीस कोठडी सुनावली.