बीड : धारूर तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावासाठी संपादित जमिनीच्या मावेजा प्रकरणात दाखल झालेल्या दिवाणी दाव्यात माजलगावच्या सह दिवाणी न्यायाधीशांनी बीड पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली असून 'तुम्हाला सात दिवसाचा तुरुंगवास का ठोठावू नये ? ' अशी विचारणा केली आहे. कार्यकारी अभियंत्याला अशी नोटीस आल्याने खळबळ माजली आहे.
भूसंपादन मावेजासंदर्भात संपादन संघ असलेल्या यंत्रणा कायमच अनास्था दाखवीत आल्या आहेत. संपादित जमिनीच्या संदर्भाने निवाडे आणि न्यायालयीन निर्णय होऊनही रक्कम जमा करण्यास यंत्रणा टाळाटाळ करतात आणि ज्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना खेटे घालावे लागतात हे विदारक चित्र आहे. धारूर तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाच्या बतीत देखील असेच होत आहे. हा तलाव झाल्यानंतरही अजूनही शेतकऱ्यांचे दावे सुरूच आहेत. अशाच एका दाव्यात रामकिसन फुटाणे विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणात आता माजलगावच्या सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) न्यायालयाने दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश २१ नुसार बीड पाटबंधारे विभाग , मुख्यालय अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावून ''तुम्हाला सात दिवस तुरुंगवास का ठोठावू नये' अशी विचारणा केली आहे. निवाड्याची रक्कम वेळेत जमा न केल्याने न्यायालयाने सदर नोटीस वाजवली आहे. कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याला बजावण्यात आलेल्या या नोटिसीमुळे खळबळ माजली आहे.