Advertisement

बंदी केवळ 'शिवसेना' वापरण्यावर... गटाच्या नावासह वापरता येईल शिवसेना शब्द

प्रजापत्र | Saturday, 08/10/2022
बातमी शेअर करा

बीड: शिवसेनेतील वादाच्या संदर्भाने अखेर निवडणूक आयोगाने 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठविले आहे, त्यासोबतच दोन्ही गटांना 'शिवसेना' हे नाव वापरण्यास मज्जाव केला आहे. मात्र याचा अर्थ शिवसेना संपली असा नाही. तर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता दोन्ही गटांना शिवसेना या शब्दाचा समावेश असलेले नवे नाव वापरता येणार आहे. 

निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशाने आता केवळ 'शिवसेना' हा शब्द वापरता येणार नाही. त्याऐवजी ज्या कोणत्या गटाला नविन नावाला जोडून शिवसेना हा शब्द किंवा शिवसेना शब्दाला जोडून आणखी एखादे नाव वापरायचे असेल तर ते वापरता येणार आहे. 

अर्थात हे काही देशात पहिल्यांदा होत नाही. ज्या ज्या वेळी कॉंग्रेस पक्षात फुट पडली होती, आणि त्या पक्षाचे मुळ चिन्ह गोठवण्यात आले होते, त्या त्या वेळी केवळ 'कॉंग्रेस' हे नाव वापरता येत नव्हते, त्यातूनच कॉंग्रेस (आर), कॉंग्रेस (आय), कॉंग्रेस ( एस) असे गट अस्तित्वात आले होते. रिपाइं च्या बाबतीतही रिपाइं (आ), रिपाइं (क) असे गट झालेले आहेत. 

त्यामुळे आता शिवसेनेच्या बाबतीतही शिवसेना (ठा), शिवसेना (शिं) किंवा अशाच आशयाची नावे दोन्ही गट वापरु शकतील. आयोगाने दोन्ही गटांना प्राधान्यक्रमाने तीन नावे आणि तीन चिन्ह सुचवायला सांगितले आहेच.

Advertisement

Advertisement