Advertisement

खाजगी रुग्णालयातील निष्काळजीपणा घेतोय रुग्णांचे बळी

प्रजापत्र | Monday, 09/11/2020
बातमी शेअर करा

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांना उपचारासाठी परवानगी देण्यात आली , ती काळाची गरजही होती. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा लक्षात घेता खाजगी दवाखाने आल्याने कोरोना उपचाराला गती आली हे वास्तव आहे. मात्र हे उपचार करताना मागच्या काही दिवसात खाजगी रुग्णालयांमधील निष्काळजीपणा रुग्णांचे बळी घेत असल्याचे चित्र आहे.
कोरोना हा आजार अजूनही अनेक प्रकरणात अनाकलनीय आहे, मात्र असे असले तरी कोरोनाबाबतीत अनेक अंदाज आता बांधता येत आहेत. कोरोना काळात किंवा कोरोनोत्तर काय समस्या उद्भवू शकतात याबाबत बऱ्यापैकी संशोधन समोर आले आहे. मात्र असे असतानाही बीड जिल्ह्यात तरी खाजगी रुग्णालयांचा मृत्युदर अधिक आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये जे मृत्यू झाले त्यात अनेक प्रकरणात रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा झाल्याची जनभावना आहे. रुग्णालयाच्या प्रिस्क्रिप्शनवर कदाचित हा निष्काळजीपणा सिद्ध करता येणार नाही, मात्र ज्यांच्या आयुष्याचे 'लोटस ' (कमळ ) विझले आहे त्यांचे नातेवाईक जे बोलत आहेत ते धक्कादायक आहे.
खाजगी रुग्णालये अधिकचे शुल्क वसूल करीत आहेत हि बाब तर आहेच, अनेक रुग्णालयांमधील हे प्रकार लेखापरीक्षणात देखील समोर आले आहेत. अधिकचे घेतलेले पैसे परत करण्याची वेळ रुग्णालयावर आली. मात्र आता त्यापेक्षाही गंभीर मुद्दा समोर येतोय तो रुणांबद्दलच्या व्यवस्थेचा. एका रुग्णालयात कोरोनामधून बाहेर पडलेले एक रुग्ण पुन्हा दाखल झाले, त्यांना छातीत दुखत होते, घाम येत होता , त्यांचे अकल्पित निधन झाले. या प्रकरणात रुग्णालयाने त्यांची ह्रदयरोगाच्या दृष्टीने तपासणी आणि उपचार योजनाच केली नाही असे नातेवाईक सांगतात. अशा तक्रारी अनेकांच्या आहेत. ज्यांच्या जवळचे नातेवाईक जातात ,त्यांच्या वेदना अधिक असतात . मात्र मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये वेळेवर डॉक्टर नसणे, रुग्णांच्या तक्रारी गांभीर्याने न घेणे , काय काय समस्या उदभवू शकतात हे डॉक्टरांनी लक्षात न घेणे यामुळे जर रुग्णांच्या आयुष्याचे 'लोटस ' मिटणार असेल आणि रुग्णालयेच जर 'काळ ' होणार असतील तर खाजगी रुग्णालयांनी विचार करण्याची गरज आहे. कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये नंतर ह्रदयरोगाचा त्रास होतो, रक्त घट्ट होण्याचे प्रकार घडतात , त्यामुळे रुग्णाला काही दिवस रक्त पातळ होण्यासाठी उपचार दिले जातात , पण अनेक प्रकरणात या संशोधनाकडे देखील काही डॉक्टर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.  रुग्णालयांचा निष्काळजीपणा कदाचित कायद्याच्या चौकटीत सिद्ध होणार नाही, पण जनभावनेचे काय ?

Advertisement

Advertisement