Advertisement

पत्नीच्या आत्महत्येची खोटी माहिती दिल्याने दारुडा पती पोलिसांच्या ताब्यात

प्रजापत्र | Sunday, 02/10/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर)- दारुड्या पतीचा मध्यरात्री पोलिसांना ११२ नंबर डायल करून पत्नी आत्महत्या करत असल्याची खोटी माहिती दिली. पोलिसांनी सतत येणाऱ्या फोन कॉलमुळे तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता संबंधित व्यक्तीने खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले. सदर व्यक्तीला धारूर पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ तिडके असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.

 

 

नवनाथ विठ्ठल तिडके हा धारूर  तालुक्यातील (जि.बीड) भोगलवाडी गावात राहतो. त्याने मध्यरात्री पोलिसांना ११२ नंबर वर कॉल करत माझी बायको घरातून निघून गेली आहे आणि ती आत्महत्या  करणार असल्याची माहिती दिली. एकदा नव्हे तर अनेक वेळा कॉल येत असल्यामुळे धारूर पोलिस तत्काळ भोगलवाडी गावात तिडके याच्या घरी पोहोचले. त्यावेळी नवनाथ तिडके आणि त्याची पत्नी दोघेही एकाच घरात त्यांना आढळून आले. पोलिसांनी  अधिक चौकशी केल्यानंतर नवनाथ याने दारूच्या नशेत फोन केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

 

 

या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी नवनाथ तिडके यांच्याकडे याबद्दल विचारणा केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. यातूनच त्याने हा प्रकार केल्याची त्याने पोलिसांकडे कबुली दिली. पोलिस अंमलदार संतोष बहिरवाडी यांच्या फिर्यादीवरून नवनाथ विठ्ठल तिडके याच्यावर बनावट कॉल  केल्याप्रकरणी धारूरच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज धारूर पोलिसांनी त्याला अटक केली. संकट काळात नागरिकांना तात्काळ पोलिसांची मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून ११२ नंबरची हेल्पलाइन  जारी करण्यात आली आहे. परंतु, या नंबरवर फोन करून खोटी माहिती सांगणे, टिंगल करणे असे अनेक प्रकार समोर येत आहेत.
 

Advertisement

Advertisement