Advertisement

दुधाच्या भेसळीसाठी वापरणारी १७०० किलो पावडर जप्त

प्रजापत्र | Sunday, 02/10/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२ (प्रतिनिधी)-जिल्हयात अवैध गुटखा,भेसळयुक्त पदार्थावरील कारवाईसाठी अन्न प्रशासनाने चांगलाच पुढाकार घेतला असून शनिवारी (दि.१) रात्री आष्टी तालुक्यातील धानोराजवळ दुधातील भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या १७०० किलो पावडरचा साठा जप्त करण्यात आला आहे.अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या मार्गदर्शनखाली अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी ही कारवाई केली. 

 

    सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात मिठाई,खावा,बेकरीतील पदार्थांची मागणी वाढली आहे.त्यामुळे भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीला आळा बसवा यासाठी अन्न प्रशासनाने जिल्हाभर तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली.शनिवारी (दि.१) रात्री धानोऱ्याजवळ दुधातील भेसळीसाठी वापरणारी पावडर या कारवाईत जप्त करण्यात आली आहे.या पावडरचा वापर दूध घट करण्यासाठी केला जात होता.तसेच बेकरीतील पदार्थांसाठीही या भेसळयुक्त पावडरचा वापर होत असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाल्यानंतर शेख समीर शेख अकबर (वय-३२ रा.धानोरा) यांच्या गोडाऊनवर छापा मारत 
२५ किलोचे ४८ पोते आणि २५ किलोचे २० पोते असा १७०० किलो पावडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला.याशिवाय ज्या गाडीतून या भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असे ती गाडी (एम.एच.१६ सी.सी.७३८७) ही अंभोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून एकूण ५ लाख २ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement