मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पुढील 3 दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरात काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असल्या तरी येणारे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, आता परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. परतीच्या पावसाची देशात पहिल्यांदा राजस्थानात चाहूल लागली. मात्र, महाराष्ट्रात परतीचा पाऊस थैमान घालू शकतो. राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सध्याचा वेग पाहता त्याला राज्यात येण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोषक हवामानाची निर्मिती
पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पोषक हवामानाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 3 दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
याठिकाणी बरसणार
राज्यात विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि भंडारा तसेच संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
परतीचा पाऊस 10 ऑक्टोबरला
उत्तर पंजाब आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पूर्व पश्चिम पट्टा सक्रिय आहे. या कारणामुळे परतीचा पाऊस 5 ते 10 ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची शक्यता आहे.