बीड-सध्या नवरात्र उत्सवला सुरुवात झाली असून उपवास सोडण्यासाठी भगरीचा वापर मोठया प्रमाणवार वाढला आहे. बाजारात खराब भगर आणि पिठाची विक्री होऊ लागल्यामुळे बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी 100 पेक्षा अधिक रुग्णांना उलटी आणि मळमळचा त्रास होऊ लागल्याचे दोन दिवसात समोर आले होते.यानंतर अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी जिल्हाभरात तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी गेवराईच्या मोंढा भागातून 300 किलो भगर जप्त केल्यानंतर आज (दि.28) रात्री 10 वाजता पुन्हा गेवराई तालुक्यातील उमापूरमधून 350 किलो खराब भगरीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात खराब भगर आणि भगरीचे पीठ खाल्ल्यामुळे लक्ष्मीआई तांडा, जुजगव्हण, चकलंबा भागातील नागरिकांना उलटी,मळमळ असा त्रास सुरु झाला होता. या रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान खराब भगरीची बाजारात विक्री मोठया प्रमाणावर होऊ लागल्यामुळे अन्न प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक गतिमान केल्याचे पाहायला मिळत आहे. काल गेवराईच्या मोंढ्यातून 300 किलो भगर जप्त केल्यानंतर आज रात्री उमापूरमधील चिंतामणी किराणा दुकानातून 358 किलो भगरीचा साठा जप्त करण्यात आला. ही भगर खाण्यासाठी योग्य नसल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी दिली असून दुकान मालक अजित पटनी यांच्या दुकानातील हा माल होता.दरम्यान दोन दिवसात बीड जिल्ह्यातून 650 किलो भगरीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा