Advertisement

सहा वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

प्रजापत्र | Tuesday, 27/09/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.27 सप्टेंबर – सहा वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारुर (Dharur) तालुक्यातील वाघोली येथे घडली. घरातील कपाटात ठेवलेले सफरचंद घेण्यासाठी गेलेल्या बालकाला कपाटाच्या खाली लपलेल्या विषारी सापाने दंश केला. बालकाला तात्काळ अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला.

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आदित्य अप्पाराव गव्हाणे (वय 6 वर्ष) रा. वाघोली (ता. धारुर) हा बालक रविवारी (दि.25) दुपारी घरातील कपाटात आणून ठेवलेले सफरचंद खाण्यासाठी गेला. त्याने कपाट उघडून आतील सफरचंद घेतले, यावेळी कपाटाच्या खाली लपलेल्या सापाने डाव्या पायाच्या पंजाला वरच्या बाजूने दंश (snakebite) केला. दंश करताच तो रडत बाहेर गेला व काहीतरी पायाला चावल व ते मऊ बेडका सारखे होते असं काहीतरी चावलं म्हणून आईला सांगितले. साप चावला असल्याची शंका आल्यामुळे कुटूंबियांनी तातडीने त्यास अंबाजोगाई (Ambajogai) येथे स्वाराती रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर अतिदक्षता (ICU) विभागात उपचार सुरू होते.

 

 

अखेर आज मंगळवारी (दि.27) बालकाची दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. आदित्यचा पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर सकाळी 9 वा. शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबाचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. अचानक अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकल्याचे निधन झाल्याने वाघोली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

( Six-year-old boy dies of snakebite; Incidents in Dharur Taluka. )

Advertisement

Advertisement