Advertisement

बीड  : माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा झालेला मृत्यू आणि त्याचा शोध घेताना एनडीआरएफच्या जवानाला गमवावे लागलेले प्राण यामुळे हळहळ व्यक्त होत असतानाच, आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतः धरणात उतरण्याची 'संवेदनशीलता ' दाखविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय  माजलगावच्या तहसील कार्यालयाला मागच्या तीन महिन्यात बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य देखील पुरवू शकले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी धरणात उतरण्यासोबतच आपत्ती   'व्यवस्थापन' सुरळीत करणे आवश्यक आहे.
माजलगावच्या  तहसीलदारांनी मे महिन्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपत्ती काळात बचाव कार्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी केली होती. तहसील कार्यालयाला दोरखंड, लाईफजॅकेट , लाइफरिंग , बॅटरी , अग्निशमन यंत्रणा आदींचा पुरवठा करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र मागच्या तीन महिन्यात या पत्रावर नेमके काय झाले हे समजू शकलेले नाही. माजलगाव धरणातली दुर्घटना घडल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी मजळगावच्या तहसीलदारांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मे महिन्यात केलेल्या मागणीप्रमाणे आपत्ती बचाव कार्यसाठीचे साहित्य पुरविण्याची विनंती  केली आहे.
माजलगाव तालुक्यात गोदावरी , सिंदफणा या दोन मोठ्या नद्यांचे पात्र आहे, काही गावांमध्ये कुंडलिका नदी जाते, माजलगाव धरणाचा मोठा प्रकल्प आहे. जायकवाडी मधून पाणी सोडल्यानंतर माजलगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क दरवर्षी तुटतो , त्यामुळे पावसाळयात नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने माजलगाव तालुका संवेदनशील आहे. मात्र अशा तालुक्यातून बचावकार्यासाठीच्या साहित्याची आलेली मागणी देखील जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडत असेल तर जिल्हाप्रशासनाचे हेच आदर्श आपत्ती व्यवस्थापन आहे का  असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बचाव कार्यासाठी धरणात उतरण्यासाठी जी संवेदनशीलता दाखविली तीच संवेदनशीलता व्यवस्थापनसाठी देखील दाखवावी असा सूर लावला जात आहे.  

Advertisement

Advertisement