Advertisement

एका जवानाच्या बलिदानानंतर डॉ. फपाळ यांचा मृतदेह सापडला

प्रजापत्र | Monday, 19/09/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.19 सप्टेंबर – एका जवानाच्या बलिदानानंतर डॉ. फपाळ यांचा मृतदेह सांयकाळी 5 वाजता सापडला. डॉ. फपाळ यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथील एनडीआरएफचे पथक माजलगाव धरणाच्या (Majalgoan Dam) जलाशयात आज सकाळी दाखल झाले. दरम्यान डॉ. दत्ता फपाळ यांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करणारा एक केडीआरएफचा जवान दुपारी पाण्यात बुडून मृत्यू पावला आहे.
( After the sacrifice of a soldier, Dr. Phapal’s body was found; 32 hours of tireless efforts finally succeeded. )

 

 

काल दि.18 रविवारी धारुर (Dharur) तालुक्यातील तेलगाव येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. दत्ता फपाळ हे माजलगाव धरणात पोहत असताना सकाळी 8 च्या सुमारास बुडाल्याची घटना घडली. त्यांच्या मृतदेहाचा शोध काल सकाळपासून घेण्यात येत आहे. यासाठी विशेष करुन कोल्हापूरहून (Kolhapur) एनडीआरएफच्या (NDRF) बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. बचाव पथकाचे शोधकार्य सुरु असतानाच पथकातील दोन जवान पाण्यात बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. यातील शुभम काटकर या जवानास बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र राजु मोरे हा जवान मासेमारीच्या जाळ्यात अडकून गतप्राण झाला. बचाव पथकातील (rescue team) इतर जवान व स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने जवानाचा शोध घेण्यात आला. विशेषतः स्थानिक महिला मच्छिमारांंनी टाकलेल्या गळाला केडीआरएफच्या जवानाचा शोध लागला. यानंतर जवानाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले.

 

 

घटनास्थळी आमदार प्रकाशदादा सोळंके, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनीही भेट देत बचावकार्यासाठी मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह पोलीस घटनास्थळी तळ ठोकून होते. मासेमारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात जवान अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका जवानाच्या बलिदानानंतरही डॉ. फपाळ यांच्या प्रेताचे शोधकार्य स्थानिक भोई समाजाचे तरुण व बचाव पथकातील जवानांनी शोधकार्य सुरुच ठेवले. तब्बल 32 तासांच्या अथक प्रयत्नांतून व एका जवानाचा बळी गेल्यानंतर सांयकाळी 5 वाजता डॉ. दत्ता फपाळ यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

Advertisement

Advertisement