येत्या २४ सप्टेंबरला सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचे दिडशेवे वर्ष सुरु होत आहे. वैदिक धर्माच्या नावाने पूरोहितशाहीने रुजवलेल्या मानसिक गुलामगिरीतीतून बहुजनांनी मुक्त व्हावे यासाठी आयुष्यभर झटलेल्या म. फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी एक नवा विवेकी आणि समतावादी पर्याय म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आपल्या सार्वजनिक आयुष्याच्या पुर्वार्धात, आपल्या आत्मसन्मानासाठी वेदोक्त म्हणजे वेदातील मंत्रांचा अधिकार मिळावा म्हणून भांडणारे लोकराजा शाहू महाराज आपल्या सार्वजनिक आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र सत्यशोधक समाजाचे खंबीर पाठिराखे बनले होते.
जातीव्यवस्थेने शुद्र आणि अस्पृश्य म्हणून हिनवल्या गेलेल्या समाजाला माणूस म्हणून सन्माने जगण्याचे अधिकार मिळावेत यासाठी म. फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शोषित समाजातील मुली-मुलांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी शिक्षणप्रसार, विधवा महिलांच्या केशवपनाबरोबरच त्यांच्या जगण्यातील आनंद हिरावून घेणाऱ्या सर्व परंपरांना विरोध, अस्पृश्यतेच्या अमानवीय प्रथेला कृतीशील विरोध, कुणबी शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळावा म्हणून आग्रह, पूरोहितांनी आपल्या पोटापाण्यासाठी रुजवलेल्या कर्मकांडात अडकून बहुजनांनी आपले मानसिक, आर्थिक शोषण करुन घेऊ नये म्हणून लोकशिक्षण अशा अनेक आघाड्यांवर म. फुले यांनी कृतीशील समाज प्रबोधनाची भूमिका ताकदीने पुढे नेली.
म. फुले यांनी स्वतः सत्यशोधनाचा खडतर मार्ग स्विकारला होता. बहुजनांचे कल्याण या मार्गानेच होणार असल्याचा त्यांना विश्वास असल्याने बहुजनांना या मार्गावर आणण्याचे काम अनेक प्रकारे ते करत होते. आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, म. फुले यांचे ते काम आजही अपूर्ण आहे.
आज मानवी जीवनातील अनिश्चितता आणि असुरक्षितता वाढते आहे. सर्व क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा माणसांना अस्थिर करत आहे. देशाची संसाधने मुठभर लोकांसाठी वापरली जात आहेत. पैसा पैसेवाल्याकडेच जातोय. जगातील दोन नंबरची श्रीमंत व्यक्ती भारतातील गौतम अदानी हे बनले आहेत. भारतातील अब्जाधिशांची संख्या वाढत आहे. पण दुसरीकडे लाखो लोक गरीबी रेषेखाली ढकलले जात आहेत. शिक्षण, आरोग्यसुविधा अशा प्राथमिक गरजाही त्यांच्या पूर्ण होत नाहीयेत. शेतकरी, शेतमजूर आपल्या घामाचा नीट दाम मिळत नाही म्हणून हैराण आहेत. रोजगाराअभावी युवांची लग्ने जुळत नाहीत. अशा हतबल स्थितीत संघटित होऊन आपले अधिकार मिळविण्याकरिता कायद्याच्या मार्गाने आवाज उठविण्याऐवजी, माणसे अधिकच दैववादी बनत चालली आहेत. ज्यांचं बरं चाललय असे समूह प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे या दैववादी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत. ज्या महिलांनी संसद व विधानसभेतील पन्नास टक्के आरक्षणासाठी आवाज उठवणे अपेक्षित आहे त्या महिला चौकात अथर्वशीर्ष पठणाचे कार्यक्रम साजरे करत आहेत. कष्टाच्या पैशातून पै पै जमा करून बांधलेल्या घरात प्रवेश करताना, डोकं गहाण ठेवायला लावणारी सत्यनारायणाची पूजा आजही अनेकांना गरजेची वाटते. ज्या घरातील माणसांची तोंडे एकमेकाच्या दिशेला असतात, ज्यांच्यात संवाद असतो, त्यांना घराचा दरवाजा उत्तरेला आहे की दक्षिणेला याची चिंता करावी लागत नाही. पण घरातच संवाद तुटलेली माणसे वास्तुशास्त्राच्या नादी लागून स्वतःचा खिसा साफ करण्याच्या कारस्थानाचे बळी होतात. स्वतःचे आणखी नुकसान करुन घेतात. जे माता, बुवा, बाबाजी कधीही शिक्षणाच्या, रोजगाराच्या प्रश्नावर तोंड उघडत नाहीत, किंबहुना आपल्या जगण्याचे हे प्रश्न आपण विसरावेत, त्यावर आपण आवाज उठवू नये म्हणूनच जे मायावी अध्यात्माचे जाळे विणतात त्यांचे दरबार कधी ओस पडत नाहीत. समाजात फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने जयघोष वाढत असताना त्यांच्या विचारांना मात्र आपण दूर लोटत आहोत.
आयुष्यात अडचणी येत असतात. संकटे कुणाला चुकली आहेत? आपण जर घरी आणि दारी संवाद वाढवला, घरातील सर्वांनी एकमेकाशी मन मोकळं करायला सुरूवात केली, अडचणीला धावून येणारे नातेवाईक जपण्याची, जीवाला जीव देणारं मित्रमंडळ वाढवण्याची भूमिका निभावली तर हीच माणसे संकटात मदतीला धावून येतात. पण आपण आपल्यातच इतके अडकून पडलो आहोत की मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी आपल्याजवळ वेळच नाहीये.
पण ज्याला असे मित्र व नातेवाईक असतात त्याला बाबा, बुवा, माताजीचे पाय धरण्याची व त्यांच्या पायावर आपला खिसा रिकामा करण्याची वेळच येत नाही.या पार्श्वभूमीवर, म. फुले यांनी पुणे शहरातील ज्या भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली त्या शाळेसमोर येत्या २४ सप्टेंबरला सत्यशोधक नागरिक जमणार आहेत व म. फुले यांचे अखंड, सावित्रीबाईंच्या कविता गात गात सत्यशोधक विचारांचा जागर करणार आहेत. म. फुले समता प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचा यात पुढाकार आहे. आपणही २४ सप्टेंबरला हे करुया आणि दैववादी न बनता प्रयत्नवादी बनण्याचा निर्धार करूया. आनंदी जगण्याचा मार्ग चालूया.