बीड दि. १० (प्रतिनिधी ) : बीड शहरातून जाणाऱ्या आणि वर्दळीचा प्रमुख मार्ग असलेल्या नगर रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते राजुरीपर्यंतचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. आमदार आणि माजी मंत्र्यांच्या गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून चारचाकी तर सोडाच, दुचाकीसुद्धा चालविणे अवघड होत आहे. मात्र लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत . या रस्त्याचे काम अजूनही सुरु होत नाही, त्यामुळे पाच पन्नास बळी गेल्यावरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या रस्त्याचे काम सुरु करणार का प्रश्न आहे.
बीडहून अहमदनगरला जाण्यासाठीचा नगर रस्ता हा बीडमधील प्रमुख रस्ता आहे. बीड तालुक्यातील राजुरीसह अनेक गावांना जान्यासातघी नागरिकांना याच रस्त्यावरून जावे लागते . तसेच बीडमधील अनेक प्रमुख कार्यालये याच रस्तावर आहेत . मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते राजुरी फाट्यापर्यंतचा हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे. रस्त्यावरून वाहने चालविताना खड्डे चुकवायचे तरी किती आणि कसे हा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र महामार्ग प्राधिकरण आता रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे बळी जाण्याची वाट पाहत आहे का असाच प्रश्न सामान्यांना पडला आहे.
नुसता दर्जा वाढवून काय होणार ?
बीड शहरातून जाणारा हा रस्ता पूर्वी राज्य मार्ग होता . त्यामुळे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, काही महिन्यांपूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे गेला आहे. रस्त्याला भलेही राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असेल, मात्र दर्जवंध झाल्यानंतरही या रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली एक खडाही टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे नुसतीच दर्जावाढ होऊन फायदा काय ? असा सामान्यांचा प्रश्न आहे.
आमदारांनी घालावे लक्ष
हा रस्ता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गावाकडे जाणारा आहे. त्यांना स्वतःला गजानन कारखान्याकडे जाण्यासाठी देखील याच रस्त्यावरून जावे लागते. त्यासाठी तरी त्यांनी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे असा सामान्यांचा सूर आहे.
केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाची निवेदने
नगर रस्त्याला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा आहे. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे भाजपच्या आहेत. केंद्रात भाजपची सत्ता आहे. असे असताना बीडचा भाजप केवळ रस्त्यासाठी खासदारांना निवेदने देत आहे. ज्यांची केंद्रात सत्ता आहे, त्यांनी निवेदने नाही, तर रस्ता करून दक्खविणे आवश्यक आहे.