बीड - चोरलेल्या मोबाईलचा आयएमईआय नंबर बदलून तो दुकानदारा मार्फत ग्राहकांना विक्री करणार्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला असून नंबर बदलणार्यासह दुकानदार आणि दलाल अशा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून 42 मोबाईलसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रात्री पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
मोहसीन खान रफिक खान (रा. इस्लामपुरा) हा चोरीचे मोबाईल विकत घेऊन त्याचा आयएमईआय नंबर घरी बदलत होता. ते नंबर बदलून फारुक युसुफ पठाण (रा. शहेंशाहनगर, पेठ बीड), शेख आफरोज शेख नजीर (रा. भालदारपुरा) यांच्या मार्फत दुकानदारांना देत होता. याची माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाठवून त्याठिकाणी छापा टाकला. या वेळी वरील आरोपींसह 42 मोबाईल, लॅपटॉप असा 4 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेत पेठ बीड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यातून मोबाईल चोरांची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, डीवायएसपी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कुकलारे, पीएसआय संजय तुपे, एपीआय विलास हजारे, पो.हे.कॉ. ठोंबरे, शेख रशीद, कातखडे, दुबाले, शिंदे, मराडे यांनी केली.