बीड दि.३ (प्रतिनिधी)-येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अशासकीय सदस्यांचे प्रशासक मंडळ आणण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असतानाच आता विद्यन्मान प्रशासक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या अप्पर आयुक्त अविनाश पाठक यांनाही जिल्हा बँकेचा कारभार नको असल्याची माहिती आहे. आयुक्तालयातील कामकाज पाहून जिल्हा बँकेचा कारभार चालविणे गैरसोयीचे असल्याचे सांगत आपल्याकडील प्रशासकपदाची जबाबदारी काढून टाकावी अशी विनंती करणारा अर्जच अविनाश पाठक यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना दिला आहे. त्यावरून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही सहकार आयुक्तांना तशी विनंती केली आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एप्रिल २०२१ मध्ये अप्पर आयुक्त अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. या प्रशासक मंडळाला त्यानंतर मुदतवाढ देखील देण्यात आली. मात्र आता प्रशासक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या अप्पर आयुक्त अविनाश पाठक यांनीच 'आपल्याकडे आयुक्तालयातील अर्धन्यायिक प्रकरणांचा व्याप असल्याने जिल्हा बँकेचा कारभार सांभाळणे गैरसोयीचे असल्याने हा पदभार काढावा ' अशी विनंती करणारा अर्ज विभागीय आयुक्तांना दिला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी राज्याच्या सहकार विभागाचे आयुक्त अनिल कवडे यांना पत्र लिहून अविनाश पाठक यांच्याकडे असलेला जिल्हा बँकेच्या प्रशासक पदाचा पदभार काढण्याची विनंती केली आहे.दुसरीकडे जिल्हा बँकेवर ११ सदस्सीय अशासकीय प्रशजासक मंडळ आणण्याच्या हालचाली वेगात आहेत.
बातमी शेअर करा