Advertisement

नातेवाईकांचे सांत्वन करून परताना काळाचा घाला

प्रजापत्र | Saturday, 03/09/2022
बातमी शेअर करा

कडा  :  मृत मावस भावाच्या कुटुंबाचे सांत्वन करून परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला अज्ञात चारचाकीने गितेवाडी फाट्याजवळ जोरदार धडक दिली. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी आहे. महादेव पाराजी सापते ( ३७ ) असे मृताचे नाव आहे. 

 

 

आष्टी तालुक्यातील खाकाळवाडी येथील महादेव पाराजी सापते यांच्या मावस भावाचे निधन झाले आहे. यामुळे महादेव सापते पत्नीसह धामणगाव येथे भावाच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी गेले होते. जाताना त्यांनी नातेवाईकांसाठी जेवणाचा डब्बा घेतला होता. नातेवाईकांसोबत जेवण करून रात्री दोघेही दुचाकीवरून गावाकडे परत येत होते. याचवेळी कड्यावरून धामणगावकडे भरधाव वेगात जात असलेल्या अज्ञात चारचाकीने गितेवाडी फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील महादेव पाराजी सापतेचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी पुष्पा महादेव सापते ( ३२) गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चारचाकी तेथून फरार झाली.
 

Advertisement

Advertisement