केज (प्रतिनिधी) - तालुक्यातील साळेगाव येथील आठवडी बाजारातून टेम्पोत 11 जनावरे भरुन त्यांची कत्तल करण्यासाठी माळेगाव मार्गे उस्मानाबाद येथे घेऊन जाणार्यास पोलीसांनी ताब्यात घेत 10 गायी व 1 बैल अशा 11 जनावरांची सुटका केली. सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने 1 सप्टेंबर रोजी केज येथे माळेगाव चौकात ही कारवाई केली.
अजीम नाईम काजी (रा.उस्मानाबाद) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी परळी येथील व्यापारी साळेगाव आठवडी बाजारातून टेम्पो (क्र.एम एच 08 एच 4397) मध्ये मोठे 11 जनावरे भरून कत्तल करण्यासाठी माळेगाव मार्गे उस्मानाबाद येथे घेऊन जात आहे अशी माहिती सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. संबंधितांवर कारवाईच्या सूचना त्यांनी पथकातील कर्मचार्यांना दिल्या.पथकातील अंमलदारांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास 18.30 वाजता सदरील टेम्पो माळेगाव चौकात पकडला.वाहन चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजीम नाईम काजी (रा.उस्मानाबाद) असल्याचे त्याने सांगीतले. त्याची सखोल चौकशी केली असता उस्मानाबाद येथील व्यापारी इमरान गफार पठाण याच्या सांगण्यावरून साळेगाव येथील आठवडी बाजारातून भरून उस्मानाबाद येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी 2 लाख 25 हजार रुपये किमतीची 11 जनावरे, व 3 लाख रुपयांचा टेम्पो असे एकूण 5 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अजीम नाईम काजी व इमरान गफार पठाण(दोघे रा.उस्मानाबाद) यांच्याविरुद्ध युसुफवडगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अंमलदार मुकुंद ढाकणे, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर,रामहरी भंडाने,सचिन आहकारे यांचा या कारवाईत सहभाग होता.