बीड दि.१ (प्रतिनिधी)-बिल्किस बानो प्रकरणातील बलात्कारी आरोपींना गुजरात सरकारने दोषमुक्त केल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. सदरील आरोपींना पुन्हा शिक्षा ठोठावण्यात यावी, या मागणीसाठी आज लोकसेना संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
गुजरात दंगलीमध्ये बिल्किस बानो यांच्यावर काही नराधमांनी अत्याचार करत त्यांच्या घरातील सदस्यांना ठार केले होते. या प्रकरणातील अकरा दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या सर्व आरोपींची गुजरात राज्य सरकारने मुक्तता केली. याच्या विरोधात सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे. या आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात यावे, त्यांची शिक्षा कायम करावी, या मागणीसाठी लोक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी इलियास इनामदार, सोफियान मनियार, मिर्झा कैसर, संजय खांडेकर, डॉ. ढवळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सदरील या आंदोलनामध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोईन मास्टर यांनीही सहभाग घेतला होता.