सोव्हिएत संघाचे माजी राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन झाले आहे. ९१ वर्षीय गोर्बाचेव्ह दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांनी युद्धाशिवाय शीतयुद्ध थांबवले होते. कोणत्याही रक्तपाताशिवाय त्यांनी शीतयुद्ध संपुष्टात आणले होते. सोव्हिएत संघाचे पतन मात्र ते थांबवू शकले नव्हते. मिखाईल सोव्हिएत संघाचे अखेरचे राष्ट्रपती होते.
गोर्बाचेव्ह सोव्हिएत संघाचे प्रभावी नेते होते. त्यांना नोबेलनेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनावर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शोक व्यक्त केला आहे.
जागतिक नेत्यांकडून शोक
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे की, मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मी दुःखी आहे. त्यांनी शीत युद्ध संपवण्यात जे साहस दाखवले ते प्रशंसनीय आहे.
फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रोन यांनी मिखाईल यांना 'मॅन ऑफ पीस' संबोधले आहे. ते म्हणाले, मिखाईल यांनी रशियन्सना स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. युरोपात शांततेसाठी त्यांच्या कटीबद्धतेने आमचा इतिहास बदलला.
संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, गोर्बाचेव्ह एक असे राजकीय नेते होते, ज्यांनी इतिहास बदलला. शीत युद्ध शांततापूर्ण रितीने संपवण्यासाठी त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.
अमेरिकन नेते आणि बॉडी बिल्डर अरनॉल्ड श्वेजनेगर यांनीही गोर्बाचेव्ह यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. अरनॉल्ड यांनी गोर्बाचेव्ह यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. त्यांनी लिहिले आहे, एक जुनी म्हण आहे, नेव्हर मीट युअर हिरोज. मला वाटते हा चांगला सल्ला नाही, जो मी ऐकलाय. मिखाईल गोर्बाचेव्ह माझे हिरो होते. त्यांची भेट ही सन्मान आणि आनंदाची गोष्ट होती.
सोव्हिएत संघाचे पतन ट्रॅजेडी, गोर्बाचेव्ह जबाबदार
गोर्बाचेव्ह वादग्रस्त राहिलेत. पुतिन यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले नव्हते. पुतिन सोव्हिएत संघाचे पतन ट्रॅजेडी समजतात. यासाठी ते गोर्बाचेव्ह यांना जबाबदार धरतात. पुतिन यांच्यासह अनेक रशियन नेते मानतात की, सोव्हिएत संघ तुटल्यानंतर कमजोर झाला आणि त्यांची अर्थव्यवस्था पडली. तेव्हा रशिया आर्थिक संकटाचा सामना करत होता.
१९९० मध्ये नोबेल पुरस्कार
सोव्हिएत संघ फुटल्यानंतर गोर्बाचेव्ह यांनी रशियन मीडिया आणि कला क्षेत्राला स्वातंत्र्य दिले होते. त्यांनी सरकारवरील कम्युनिस्ट पक्षाची पकड ढिली करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. यादरम्यान हजारो राजकीय कैदी आणि कम्युनिस्ट टीकाकारांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. गोर्बाचेव्ह यांनी अमेरिकेसोबत आण्विक शस्त्रबंदी करार केला होता. यासाठी त्यांना १९९० मध्ये नोबेल पुरस्कारही देण्यात आला होता.